निकषापेक्षा जादा  दिलेल्या कर्जाला नाबार्डने जरी जिल्हा बँकेला जबाबदार धरले असले तरी प्रत्यक्षात नियमानुसार होणाऱ्या कर्जाच्या पुरवठय़ाला तत्कालीन बँक कारभाऱ्यांनी  १० टक्क्य़ांची  फिरवाफिरवी केली. यामुळे तत्कालीन कारभाऱ्यांकडूनच ही रक्कम वसूल करावी, अशी मागणी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
घाटगे म्हणाले,का तत्कालीन परिस्थितीत एकतर नद्यांना पाणी नव्हते आणि शेती मालाला भावही म्हणावा तसा नव्हता. अशा परिस्थितीत स्वतच्या तुंबडय़ा भरण्यासाठी तत्कालीन कारभाऱ्यांनी कर्जपुरवठय़ाचा निर्णय १० टक्के फ़िरवाफ़िरवीतून घेतला; ज्याचा परिणाम कर्जाच्या  रकमा फुगण्यात झाला. शेतकऱ्यांच्या टाळूवरचे  लोणी खाण्याचे काम या फिरवाफिरवीतून  झाले आहे. त्यामुळे तत्कालीन कारभारीच या सर्वाला जबाबदार आहेत.
बँकेतील सत्तेचा पुरेपूर गैरवापर करुन प्रामाणिकपणे सोसायटय़ा चालवणाऱ्या पदाधिकाऱ्यांना या कारभाऱ्यांनी अडचणीत आणून संस्था बंद पाडण्याचे काम केले. सार्वजनिक जीवनात केवळ असलाच उद्योग करणाऱ्यांनी खा. सदाशिवराव मंडलिक यांच्यावर टीका करणे म्हणजे चोराच्या उलटया बोंबा आहेत. आम्ही मुश्रीफांसारख्या संस्था मोडून खात नाही तर त्या व्यवस्थित चालवतो, याची असंख्य उदाहरणे आमच्याकडे आहेत, असेही त्यांनी सांगितले.