टोल विरोधातील आंदोलनाची धार वाढविताना शुक्रवारी महापौरांसह पालिकेतील पदाधिका-यांनी वाहने, भ्रमणध्वनी प्रशासनाकडे परत केले. महापौर सुनीता राऊत, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण हे रिक्षातून, तर सभापती व नगरसेवक खासगी वाहनांतून घरी गेले. महापालिकेच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याच्या निर्णयानुसार शुक्रवारची स्थायी समितीची सभाही रद्द करण्यात आली. दरम्यान, महापौरांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा इन्कार पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
    मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रस्तेविकास प्रकल्पाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा आदेश गुरुवारी दिला होता, पण टोलवसुली सुरूच राहील असे स्पष्ट निर्देशही दिले. त्यामुळे राज्य शासनाच्या या भूमिकेबद्दल कोल्हापूरच्या जनतेत नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीही आपले राजीनामे सादर केले आहेत. नगरसेवकांनी काल स्पष्ट केल्याप्रमाणे शुक्रवारी पदाचे राजीनामे आपापल्या गटनेत्यामार्फत महापौरांकडे सुपूर्द केले. महापौर राऊत यांनी राजीनामापत्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्याकडे दिले असून ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठविले जाणार आहेत.
   शिरोली टोल नाक्यावर पोलीस व नगरसेवकांत झालेल्या झटापटीत पोलिसांनी महापौरांवर लाठीमार केल्याच्या वृत्ताचा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी इन्कार केला. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, टोलनाका परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नगरसेवकांना रोखण्यासाठी पोलिसांनी कडे केले होते. नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेऊन पोलिसांशी झटापट सुरू केली, मात्र या वेळी कोणावरही लाठीमार केला नाही. यासंदर्भातील सर्व व्हिडिओ फुटेज व छायाचित्रे मी तपासून पाहिली आहेत. त्याच्याच आधारे पोलिसांनी लाठीमार केला नाही हे स्पष्टपणे सांगत आहे. आयआरबी कंपनीला उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलीस संरक्षण पुरविण्यात आले आहे. पोलिसांनी स्वत:हून संरक्षण पुरविण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले.
    दरम्यान, जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी महापौर, आमदार यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. गुरुवारी कोल्हापूर बंद असताना नगरसेवकांनी आयआरबी कंपनीचा निषेध नोंदविण्यासाठी मोर्चा काढला होता. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे महापौर राऊत, उपमहापौर मोहन गोंजारी यांच्यासह अन्य नगरसेवक व कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर शिवाजी चौकात शासन व आयआरबीचा प्रतीकात्मक पुतळा दहन केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
 

Story img Loader