दुष्काळ निवारणाच्या कामात अधिकारी व सरकारी यंत्रणेने चांगले काम करावे, कामात, निधीत गडबड झाली तर सुटका केली जाणार नाही, घोटाळे करणाऱ्या कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी आज दिला.
पाचपुते यांनी आज नियोजन भवनमध्ये नगर तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेऊन सूचना दिल्या, त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा इशारा दिला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, सीईओ रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. पाचपुते उद्या (शनिवार) पारनेर व पाथर्डी, मंगळवारी शेवगाव, दि. १० रोजी कर्जत व जामखेड येथे टंचाई आढावा बैठक घेणार आहेत.
गाळासाठी वाहतूक खर्च देणार
पाझर तलावातील गाळ भरुन नेणाऱ्या शेतकऱ्यांना ३ कि.मी. पर्यंतचा वाहतूक खर्च नरेगा योजनेतून दिला जाणार आहे, त्याची सुरुवात २६ जानेवारीपासून होईल, त्यामुळे तलावांतील किमान ६०-७० लाख मेट्रिक ब्रास गाळ काढला जाईल. खरीप व रब्बीतील १ हजार ५९० गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे, त्यामुळे कोणत्याही पाणी योजनेचा वीजजोड तोडू नये, असा आदेश देण्यात आला आहे, पाणी योजनांची ३३ टक्के वीज बिले रक्कम भरण्याची तरतूद करण्यात आल्याचे पालकमंत्री पाचपुते यांनी सांगितले.
जिल्ह्य़ातील दुष्काळ निवारणाच्या कामावर आत्तापर्यंत सुमारे २०० कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती देऊन पातपुते यांनी सांगितले की, यापुढे आता मुळा धरणातून रोटेशन होणार नाही, भंडारदरा धरणातून दोन किंवा तीन होतील, जामखेडसाठी जानेवारी अखेर टँकर वाढवावे लागतील, टँकर भरण्यासाठी सीना धरणात साठा करण्यात आला आहे, कुकडीचे पुन्हा रोटेशन सुटल्यावर चोंडीत पाणी साठा केला जाणार आहे. घोसपुरी (ता. नगर) योजनेसाठी विसापूरमध्ये पाणीसाठा आहे, योजनेच्या थकित ८ लाख रु.चे बील भरण्यासाठी मंगळवारी निर्णय होईल. साखर कारखाने बंद झाल्यानंतर मजुरांची संख्या एकदम वाढणार आहे, सध्या १५ हजार मजूर रोहयोच्या कामावर आहेत. कृषी व सार्वजनिक बांधकाम विभागास रोहयोची कामे वाढवण्यास सांगितले आहे. टंचाईचा गावनिहाय सुधारित आराखडा १५ जानेवारीपर्यंत तयार केला जाईल, नरेगा योजनेत जिल्हा मागे पडला होता, परंतु लाभक्षेत्र, शेततळी, शौचालय याबाबतच्या अनेक अटी शिथील केल्याने त्याला पुन्हा चालना मिळेल.