‘ओ माय गॉड’ चित्रपटाच्या माध्यमातून ‘देव’ या विषयावरील वास्तव टीका काही मर्यादेपर्यंत समाज स्वीकारतो हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी आशेचा किरण आहे, असा सूर ‘ओ माय गॉड चित्रपटातील धर्मचिकित्सा’ या विषयावरील चर्चासत्रात सोमवारी व्यक्त करण्यात आला.
साधना संवाद व्यासपीठ आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित चर्चासत्रात लेखक संजय भास्कर जोशी आणि दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी सहभाग घेतला. समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते. दिग्दर्शिका सुमित्रा भावे या प्रसंगी उपस्थित होत्या.
डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणाले, ‘‘अंनिसचे काम करताना ‘देव सोडा’ असे सांगितले जात नाही. देवाच्या नावावर दिशाभूल किंवा शोषण करणाऱ्यांना विरोध हेच सूत्र आहे. माझी नीती देवातून नव्हे तर, विवेकातून येते ही त्यामागची धारणा आहे. ज्याप्रमाणे राज्य घटनेने धर्म आणि उपासना पद्धतीचा अधिकार दिला आहे त्याप्रमाणे श्रद्धा तपासण्याचा अधिकारदेखील दिला आहे.’’
संजय भास्कर जोशी म्हणाले, ‘‘श्रद्धेचे दलाल या नाजूक विषयाला चित्रपटाने धाडसाने आणि धारदारपणे हात घातला आहे. चित्रपट मनोरंजक आणि सकारात्मक विचार जरुर देतो,पण बौद्धिक समाधान देत नाही. हा चित्रपट थेट धर्माचे ‘मार्केटिंग’ करीत आहे.’’
सुनील सुकथनकर म्हणाले, ‘‘ लेखक आणि दिग्दर्शक यांची भूमिका प्रामाणिक आहे. पण, हा विषय मांडताना त्यांना व्यावसायिक तडजोडी स्वीकाराव्या लागल्या आहेत हे प्रकर्षांने जाणवते. देवाचे असणे किंवा नसणे हे सिद्ध करता येत नाही. अशा परिस्थितीत कठोर बुद्धिवादी लढा देणे अवघड असते. त्यामुळे मध्यममार्गी मांडणीतून हा विषय यशस्वीपणे हाताळण्याचे कसब साधले आहे.’’

Story img Loader