* मोनो-मेट्रोच्या गटांगळ्या
* कागदावरील प्रकल्पांना मुहूर्त कधी?
* उड्डाणपुलांना निधीची प्रतीक्षा
* एमएमआरडीएचा संथ कारभार
ठाण्याचा कायापालट घडवून आणण्यासाठी भरीव आर्थिक मदतीचे आश्वासन देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात उभ्या रहाणाऱ्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांची जंत्रीच सादर केली. मुख्यमंत्री आले आणि त्यांनी ठाणेकरांवर विकासकामांचा पाऊस पाडला, असे काहीसे चित्र सध्या काँग्रेस आघाडीचे नेते रंगवू लागले असले तरी पृथ्वीराजबाबांनी वाचून दाखविलेल्या विकासकामांच्या यादीत जुन्याच आणि त्याच त्या प्रकल्पांची जंत्री मांडण्यात आल्याने बाबांचे सरकार या वेळी तरी दिलेला शब्द पाळणार का, असा सवाल सर्वसामान्य ठाणेकरांनी उपस्थित केला आहे.
ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून तीन उड्डाणपुलांची बांधणी, पूर्व द्रुतगती महामार्गावर जागोजागी पादचारी पूल, घोडबंदर मार्गावर चार ठिकाणी पादचारी पूल, घाटकोपर-मुलुंड-कापूरबावडी तसेच घोडबंदर-भिवंडी मार्गावर मोनो-मेट्रो तसेच िरग रूट रेल्वे, मुंबई-ठाण्याला जोडणारा एलिव्हेटेड मार्ग अशा वेगवेगळ्या विकास प्रकल्पांची घोषणा गेल्या दहा वर्षांत राज्य सरकारकडून वेळोवेळी झाली आहे. मात्र, ही आश्वासने पुढे दिवास्वप्ने ठरतात, असा ठाणेकरांचा आजवरचा अनुभव आहे. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या प्राधिकरणांमार्फत घोडबंदर मार्गावर सध्या उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलांची बांधणीही अक्षरश: रडतखडत सुरू आहे. कापूरबावडी पुलाची मुंबई-घोडबंदर मार्गावरील एक मार्गिका सुरू करून सोमवारी रस्ते विकास महामंडळाने स्वत:ची पाठ थोपटवून घेण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र वर्षांनुवर्षे धीम्या गतीने सुरू असलेल्या या कामाच्या शुभारंभाचे फारसे अप्रूप सर्वसामान्य ठाणेकर प्रवाशांना फारसे नव्हते, असेच चित्र या ठिकाणी दिसून आले. त्यामुळे ठाण्यासाठी भरीव निधी देण्याची भाषा मुख्यमंत्री करत असले तरी यापूर्वीच घोषणा झालेल्या जुन्या प्रकल्पांचे काय करणार, असा सवाल सर्वसामान्य ठाणेकर उपस्थित करू लागले आहेत.
ठाणे शहरातील मीनाताई ठाकरे चौक, नौपाडा-गोखले मार्ग, अल्मेडा चौक अशा तीन मार्गावर उड्डाणपूल उभारण्याची घोषणा तब्बल सात वर्षांपूर्वी करण्यात आली होती. सुरुवातीला रस्ते विकास महामंडळाने हे पूल उभारावेत, असे ठरले. मात्र, या पुलांचे आराखडे बदलले गेल्याने या कामाचा खर्चही वाढला. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाने या कामातून अंग काढून घेतले. सुरुवातीच्या काळात या पुलांच्या उभारणीसाठी १०० कोटी रुपयांचा निधी लागेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. महापालिकेने यासाठी एमएमआरडीएकडे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर आता कुठे एमएमआरडीएने या कामासाठी १५० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. हा निधी महापालिकेकडे लवकरात लवकर वर्ग केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दिले असले तरी या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होईल, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. पूर्वद्रुतगती महामार्गावर तब्बल तीन ठिकाणी पादचारी पूल उभारण्यासाठी एमएमआरडीमार्फत निधी देण्यात येईल, असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दिला. प्रत्यक्षात या तीनही पादचारी पुलांच्या निविदा महापालिकेने यापूर्वीच काढल्या असून त्यासाठी निधीही महापालिकेच्या तिजोरीतून खर्च होणार आहे. त्यामुळे एमएमआरडीएचा निधी नेमका कधी वर्ग होणार, असा प्रश्न महापालिका वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
केवळ वल्गना
मुंबई-ठाण्याला जोडणारा वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध असावा यासाठी या मोनो-मेट्रोचे जाळे या भागात उभे केले जावे, असा विचार एमएमआरडीएच्या स्तरावर वर्षांनुवर्षे सुरू आहे. घाटकोपर-मुलुंड-कापूरबावडी या मार्गावर मेट्रो उभारण्याच्या मूळ प्रस्तावाचा अनेक वर्षे कीस काढल्यानंतर हा प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा परवडणारा नाही, असा साक्षात्कार एमएमआरडीएला झाला असून त्यामुळे हा नियोजित प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भिवंडी-घोडबंदर मार्गावर मोनो रेल्वेचे जाळे विणण्याची घोषणाही यापूर्वी झाली आहे. मात्र, या प्रकल्पातही आर्थिक अडचणी असल्यामुळे एमएमआरडीएने या प्रकल्पाची चर्चा आटोपती घेतली आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठय़ा जोशात ‘मोनो-मेट्रो झालाच पाहिजे’, अशी मागणी मुख्यमंत्र्यांपुढे केली खरी, मात्र त्याविषयी ‘विचार केला जाईल’ इतकेच आश्वासन मिळाल्याने ठाणेकरांना वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होईल का, याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई-ठाण्याला जोडणाऱ्या एलिव्हेटेड मार्गाची यापूर्वीच घोषणा झाल्याची आठवण पालकमंत्री गणेश नाईक यांनी या वेळी करून दिली खरी, मात्र या प्रकल्पाविषयी मुख्यमंत्र्यांनी ‘ब्र’देखील उच्चारला नाही.
वाहतुकीचा नवा पर्याय हवा
मुंबई आणि ठाण्याला जोडणारा वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिल्याशिवाय या दोन्ही शहरांतील नागरीकरणाचे आणि दळणवळणाचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे वर्षांनुवर्षे चर्चेच्या पातळीवर असणाऱ्या प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेदेखील आग्रही आहेत, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना केला. एमएमआरडीएच्या स्तरावर अनेक प्रकल्प यापूर्वी रखडले असले तरी मुख्यमंत्री यापुढे ते मार्गी लावतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चर्चेचे गुऱ्हाळ
ठाणे आणि कळव्याच्या मधोमध असलेल्या विटावा परिसरातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने स्कॉयवॉक उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेमार्फत एमएमआरडीएकडे यापूर्वीच रवाना करण्यात आला आहे. विटाव्यातून रेल्वे मार्ग ओलांडताना यापूर्वी मोठय़ा संख्येने रेल्वे प्रवाशांचा बळी गेला आहे. त्यामुळे हा स्कॉयवॉक काळाची गरज आहे, असा महापालिकेचा दावा आहे. गेल्या तीन महिन्यांपासून एमएमआरडीएमध्ये या प्रस्तावावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असून स्कॉयवॉकच्या भवितव्याविषयी संभ्रमाचे वातावरण आहे.