*  अतिवृष्टीचा फटका, जीवितास धोका
*  २५ इमारती पाडण्याची नोटीस
अतिवृष्टी व पुरामुळे शहरातील जीर्ण इमारती कोसळण्यास सुरुवात झाल्याने जीवितास धोका निर्माण झाला आहे. मनपा हद्दीतील अशा २५ इमारतींच्या मालकांना महानगरपालिका आयुक्तांनी इमारत पाडण्याची नोटीस बजावली आहे. मात्र, मालकांसोबतच मनपाचेही या जीर्ण इमारतींकडे दुर्लक्ष झाल्याने किमान जीवितहानी टाळण्यासाठी तरी जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शहरात, जिल्हय़ात जुलैमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे २५ हजार घरे कोसळली. यातील  ५ हजार घरे पूर्णत: कोसळली आहेत. घरांचे सर्वेक्षण सुरू असतानाच मनपा हद्दीत येणाऱ्या बायपासवरच्या फुकटनगरातील रूपल सरकार यांचे चार खोल्यांचे घर ३० फूट जमिनीत गेले. वेकोलिने भूगर्भातून कोळसा काढल्यानंतर त्यात रेती भरण्यात आली नसल्यानेच हा प्रकार झाल्याचे बोलले जाते.  कस्तुरबा मार्गावरील गुजराती समाज भवनाची ३० वष्रे जुनी इमारत, तर बाजार वॉर्ड प्रभागातील ताराबाई मोरे यांचा जीर्ण वाडाही कोसळला आहे. विशेष म्हणजे, महापौर संगीता अमृतकर, स्थायी समिती सभापती रामू तिवारी व कनिष्ठ अभियंता रवी हजारे यांचे याच प्रभागात वास्तव्य आहे.  या जीर्ण वाडय़ांचा ढिगारा तेथेच पडून असल्याने आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. एकाच दिवशी तीन इमारती कोसळल्यानंतर महानगरपालिका आयुक्त प्रकाश बोखड यांनी  इमारतींच्या मालकांना या इमारती तात्काळ पाडण्याची नोटीस बजावली आहे. पुन्हा अतिवृष्टी झाली तर या सर्व इमारती कोसळतील आणि जीवितहानीची शक्यता लक्षात घेता त्या तात्काळ जमीनदोस्त करा, असे यात म्हटले आहे.
मनपाची ही नोटीस मिळण्यापूर्वी महात्मा गांधी मार्गावरील बजाज यांची इमारत अशाच पद्धतीने कोसळली तेव्हा आजूबाजूला कुणीच नसल्याने दुर्घटना टळली. त्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीचा ढिगारा इतरत्र हलविला. मनपाने अशी नोटीस बजावली असली तरी गुजराती समाज भवन व ताराबाई मोरे यांच्या इमारतीचा ढिगारा सात दिवसांपासून तेथेच पडून असल्याने अतिवृष्टी झाली तर या दोन्ही इमारती कोसळून जीवितहानीची शक्यता आहे. ज्या २५ जीर्ण इमारतींना नोटीस बजावण्यात आल्या. यातील १७ इमारती प्रभाग क्रमांक एक अंतर्गत, तर प्रभाग क्रमांक दोनमधील आठ इमारतींचा यात समावेश आहे. प्रभाग क्रमांक तीन हा नवीन वॉर्डाचा असल्याने तेथील एकाही इमारतींचा यात समावेश नाही. प्रभाग क्रमांक एकची जबाबदारी कनिष्ठ अभियंता राजीव पिंपळशेंडे यांच्याकडे, तर प्रभाग क्रमांक दोन कनिष्ठ अभियंता रवी हजारे यांच्याकडे आहे. सध्या पाऊस थांबलेला असल्याने या अभियंत्यांनी स्वत:च्या प्रभागातील जीर्ण इमारतींवर तातडीने कारवाई करावी, अशी लोकांची मागणी आहे. एकदा अतिवृष्टी किंवा पाऊस सुरू झाला आणि पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली तर या जीर्ण इमारतींमुळे मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. तेव्हा मनपा प्रशासनाने यात वेळीच लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, असे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, मनपाने ज्या २५ जीर्ण इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत, त्यांच्या मालकांची नावेही मनपा प्रशासनाद्वारे लपवून ठेवली जात आहेत. मनपाने या सर्व इमारतींची नावे वृत्तपत्रातून प्रसिद्ध करावी, अशी लोकांची मागणी आहे.  या इमारती ‘जैसे थे’ उभ्या राहिल्या तर फार मोठे नुकसान होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा