भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथसिंग यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच उपराजधानीत आगमन होताच पक्ष कार्यकर्त्यांनी नागपूर विमानतळावर त्यांचे जल्लोशात स्वागत केले.
गेल्या आठवडय़ात नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी राजनाथसिंग यांची निवड करण्यात आल्यानंतर विदर्भात त्यांचा प्रथमच दौरा असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मोठय़ा संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. ब्रम्हपुरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला निमित्ताने राजनाथसिंग यांचे सोमवारी दुपारी १२ वाजता नागपूर विमानतळावर आगमन होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘देश का नेता कैसा हो राजनाथसिंग जैसा हो.. भारतीय जनता पक्ष जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या.
विमानतळावर माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, महापौर अनिल सोले, शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी राजनाथसिंग यांचे स्वागत केले. विमानतळावरून हेलिकाफ्टरने ब्रम्हपुरीला रवाना झाले.  यावेळी त्यांच्यासमवेत नितीन गडकरी, भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्मृती इराणी, प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार रवाना झाले. नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे नागपुरात आगमन झाल्यावर ज्या पद्धतीने शहरातील कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले होते त्या तुलनेत कार्यकर्त्यांची संख्या मात्र कमी असल्याची चर्चा विमानतळ परिसरात होती. यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गोतमारे, प्रमोद पेंडके, चेंतना टांक, राजीव हडप, संदीप जोशी, अविनाश ठाकरे आदी भाजपचे शहर आणि ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा