उपनगरी प्रवासाचे भाडे २२ जानेवारीस वाढल्यानंतर अद्याप अनेक स्थानकांवरील एटीव्हीएम यंत्रांमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत. पण त्याचा फटका नाहक प्रवाशांना बसत आहे. अनेक प्रवाशांकडून तिकीट तपासनीस दंडासहीत रक्कम वसूल करीत असल्याने ‘चूक रेल्वेची पण भरुदड मात्र प्रवाशांना’ अशी अवस्था झाली आहे.
उपनगरी तिकिटांच्या दरात वाढ झाल्यानंतर काही एटीव्हीएम यंत्रांवर बदल करण्यात आले. मात्र अन्य यंत्रांमध्ये बदल करण्यापूर्वीच पुन्हा भाडेवाढ करण्यात आली. या भाडेवाढीनंतर कोणत्याही एटीव्हीएम यंत्रांमध्ये भाडेवाढीचे बदल करण्यात आले नाहीत. कुर्ला, माटुंगा, दादर, सीएसटी, चर्चगेट येथे एटीव्हीएमचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असताना तेथील यंत्रांमध्ये बदल होणे आवश्यक होते. हे बदल करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने संबंधित कंपनीला कळविले होते तथापि, कंपनीने काही यंत्रांमध्ये बदल केल्यानंतर हे काम थांबविल्याचे समजते. यामुळे या यंत्रांवरून जुन्याच दराने तिकीट मिळते. हे तिकीट अधिकृत असूनही तिकीट तपासनीस जुन्या दराचे हे तिकीट अधिकृत नसल्याचे सांगून प्रवाशांना विनातिकीट म्हणून पकडत आहेत. दादर येथे अलीकडेच एका प्रवाशाला ‘विनातिकीट’ म्हणून दंड ठोठावल्यावर त्या प्रवाशाने तिकीट तपासनीसास संबंधित यंत्रच बंद करायला लावले होते.
काही महिन्यांपासून सर्व स्थानकांवरील एटीव्हीएम यंत्रे बंद पडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. रेल्वेच्या अपेक्षेनुसार यंत्रे अध्र्या तासात दुरुस्त व्हायला हवीत. मात्र कंपनीच्या म्हणण्यानुसार, यंत्रे दुरुस्त करण्यासाठी अवघे ११ तंत्रज्ञ असून त्यांना संपूर्ण उपनगरी विभाग सांभाळायचा असतो. त्यामुळे अर्धा तास हा खूपच अपुरा वेळ असल्याचे सांगण्यात येते.
मध्य रेल्वे प्रशासनाने सध्या जेटीबीएस (जनसाधारण तिकीट बुकींग सेवक) योजनेवर भर देण्यास सुरुवात केली असल्याने सीव्हीएम आणि एटीव्हीएम यंत्रांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे. यंत्रे नादुरूस्त आणि त्यामध्ये नव्या दरांची दुरूस्ती करण्यात टाळाटाळ याचा भुर्दंड प्रवाशांना भोगावा लागत असल्याबाबत काही प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे लेखी तक्रार केली आहे.