‘लार्जर दॅन लाईफ’ नायक असल्यामुळे अर्थातच सलमानस्टाइल अॅक्शनचा धमाका आहेच; परंतु ‘फेविकोल से’ आणि ‘नैना.’ हे गाणे सोडले तर गाणी, रोमान्स, विनोद यामध्ये चुलबुल पांडेचा दुसरा भाग फिका पडतो. चित्रपटात अस्थानी येणारी गाणी, मधे मधे आपल्या हाताखालच्या सहकारी पोलिसांबरोबर केलेले पाणचट विनोद, सलमानची हसण्याची स्टाइल आणि दिग्दर्शनकौशल्याविनाच केवळ अप्रतिम मारामारी पाहून फक्त सलमान खानचे निस्सीम चाहतेच खूश होतील. कथानकात अजिबात नावीन्य न आणता जुनाच अवतार नव्याने आणला आहे. याला दिग्दर्शक-लेखकाचे कल्पनादारिद्रय़ असेच म्हणावे लागेल.
चित्रपटाला सुरुवात होते ती शाळकरी मुलाच्या अपहरणाच्या घटनेने. त्या शाळकरी मुलाला चुलबुल पांडे आपल्या व्यवच्छेदक आक्रमण शैलीने सोडवितो. दबंग हे चित्रपटाचे शीर्षक सिद्ध करण्यासाठी चुलबुल पांडे गुंडांचा अड्डा जीपसह येऊन उद्ध्वस्त करतो अशी सलमानची पहिलीच ‘दबंग’ एण्ट्री आहे. त्यामुळे अर्थातच सलमानच्या चाहत्यांकडून शिट्टय़ा-टाळ्यांचा कडकडाट न झाला तरच नवल.
या भागामध्ये छेदी सिंगला नेस्तनाबूत केल्यानंतर चुलबुल पांडेची बदली कानपूर चौकीत थोडय़ा मोठय़ा गावात केली जाते आणि बच्चा भैय्या (प्रकाश राज) या गावातील राजकारणी-गुंड-माफिया-हुकूमशहाला संपविण्याचा विडा सलमान खान उचलतो. सलमानने बांधलेला पट्टा आपोआप नाचतो आणि त्याबरोबर सलमानही नाचतो, ते पाहून बाकीचे पोलीस, नागरिक, तरुण, सलमानचाहते सगळेच नाचू लागतात. ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा जपण्यासाठी चित्रपटातील जवळपास प्रत्येक गाण्यात आणि प्रत्येक दृश्यात प्रचंड मोठा मॉब सलमानची दबंगगिरी बघण्यासाठी उत्सुक आहे असे दाखविले आहे.
या भागात चुलबुल पांडेचे रज्जो (सोनाक्षी) हिच्याशी लग्न झालेय. आता ते मुलाला जन्म देणार आहेत. वडील विनोद खन्ना आणि ‘हाफ मॅड’ भाऊ मख्खीचंद असे चुलबुल पांडेचे कुटुंब आहे. चित्रपटाचा भडकपणा अधिक भडक दाखविण्यासाठी चित्रविचित्र रंगांचा भडिमार हेही या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे. अंगावर येणारी रंगसंगती साधून चित्रपटाचा ‘दबंग’ परिणाम प्रेक्षकावर व्हावा हा दिग्दर्शकाचा हेतू आहे की काय, असे वाटावे इतके भडक रंग पडदाभर दिसत राहतात. दर दहा मिनिटांनी चुलबुल पांडेला नाचण्याची हुक्की येते; परंतु पहिल्या चित्रपटाच्या तुलनेत ही गाणी फिकी आहेत.
खलनायक बच्चा भैय्याचा भाऊ गेंदा याची मान मोडून त्याला यमसदनास पाठविणारा चुलबुल पांडे लग्नमंडपात गेंदाचा मृतदेह सोडून निघून जातो आणि जाताना लग्नाच्या वऱ्हाडाला शुभेच्छाही देतो हे भयंकर वाटते. चुलबुल-रज्जो यांचा घरातला रोमान्स दाखविताना एकदम गाणे येते आणि रसभंग होतो. असे अनेकदा होते, त्यामुळे प्रेक्षकाचा रसभंग होतो. परंतु चित्रपटाचा हेतूच धमाल मनोरंजन करणे असल्यामुळे मारामारीचा कंटाळा आला की गाणे आणि गाण्याचा कंटाळा आला की तोंडी लावायला पोलिसांचे पाणचट विनोद असा मामला संबंध चित्रपटभर आहे. आता तुझी काही खैर नाही म्हणत बच्चा भैय्या चुलबुल पांडेला धडा शिकविण्याची धमकी देतो आणि प्रत्यक्षात मात्र त्यासाठी काहीच व्यूहरचना, कट रचत नाही हे दिग्दर्शकाचे कल्पनादारिद्रय़ आहे. वडील विनोद खन्ना आणि पुत्र सलमान यांच्यातील संवाद-विनोद अतिशय कंटाळवाणे, उगीचच घुसडल्यासारखे वाटतात. चित्रपटाचा पहिला भाग खूपच लांबतो. अर्थात गाणी-मारामारी-रोमान्स-विनोद हा फॉम्र्युला सतत दाखवायचा हा एकच इरादा दिग्दर्शकाने ठरविल्यामुळे तोच तोपणा सिनेमात येतो. ‘फेविकोल से’ या आयटम साँगमार्फत करीनाने आपली बहीण करिष्मासारखीच प्रतिमा पडद्यावर दाखविण्यात यशस्वी आहोत असा समज करून घेतलेला दिसतो. चुलबुल पांडे अपहृत मुलाची सुटका केल्यानंतर त्याच्या वडिलांकडून १० लाख रुपये उकळतो हे दाखवून दिग्दर्शकाला कोणता आदर्श प्रेक्षकांसमोर ठेवायचा आहे. त्याचबरोबर ‘फेविकोल से..’ गाण्याचे बोल इतके हिडीस आहेत की भारतीय तरुणीची पडद्यावरील प्रतिमा आणखी डागाळून टाकण्याचा जणू विडाच उचललेला दिसतो.
सबकुछ सलमान असल्यामुळे सोनाक्षीसह अन्य कलावंतांना अभिनय दाखविण्यासाठी वावच नाही. तद्दन सलमानपट म्हणून चित्रपट पाहिला जात असल्यामुळे ‘सिनेमा’ म्हणून त्यात काहीच नाही असेच म्हणावे लागेल. संगीतकारांनी जुन्या चित्रपटांतील चाली वापरून गाणी केली आहेत. त्यामुळे संगीत हे सलमानच्या सिनेमाच्या महत्त्वाचे ठरत असले तरी त्यात नावीन्य नाही. पहिल्या चित्रपटाच्या तुलनेत गाणी फिकीच आहेत.
पैसा वसूल मसाला चित्रपट म्हणजे सलमानचा चित्रपट याव्यतिरिक्त सीक्वेलपट असूनही नावीन्याचा अभाव आहे. मुन्नी पुन्हा आणली असली तरी करीना कपूरच्या पडद्यावरील वावरापुढे ती निष्प्रभ ठरते. मलायका अरोरा निर्मातीची भूमिका साकारताना स्वत:च आयटम साँग करण्याचा अट्टहास कशासाठी करते हा प्रश्न उरतोच.
वडिलांना समाधानी ठेवणे, बायकोला कायम खूश ठेवणे आणि भावाला नीट मार्गाला लावणे आणि हे करता करता गुंडांना वठणीवर आणणे असा ‘आदर्श?’ पोलीस कसाही करून पडद्यावर दाखविणे हा दिग्दर्शकाचा चित्रपट करण्याचा हेतू असल्यामुळे मध्यंतरापूर्वीचा लांबलेला चित्रपट संकलित करायचा राहून गेलाय, जुन्या अवताराची ‘कॉपी’ केली की पैसा वसूल इतका सरळसोट फॉम्र्युलाबाज विचार करून चित्रपट बनविल्याने ‘दबंग’च्या प्रेक्षकांची फसवणूक होते.
निर्माता-दिग्दर्शक – अरबाज खान
लेखक – दिलीप शुक्ला
संगीत – साजिद-वाजिद
कलाकार – सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, प्रकाश राज, अरबाज खान, विनोद खन्ना, दीपक दोब्रियाल व अन्य.
चित्ररंग : जुनाच अवतार पुन्हा
‘लार्जर दॅन लाईफ’ नायक असल्यामुळे अर्थातच सलमानस्टाइल अॅक्शनचा धमाका आहेच; परंतु ‘फेविकोल से’ आणि ‘नैना.’ हे गाणे सोडले तर गाणी, रोमान्स, विनोद यामध्ये चुलबुल पांडेचा दुसरा भाग फिका पडतो. चित्रपटात अस्थानी येणारी गाणी, मधे मधे आपल्या हाताखालच्या सहकारी पोलिसांबरोबर केलेले पाणचट विनोद, सलमानची हसण्याची स्टाइल आणि दिग्दर्शनकौशल्याविनाच केवळ अप्रतिम मारामारी पाहून फक्त सलमान खानचे निस्सीम चाहतेच खूश होतील.
आणखी वाचा
First published on: 23-12-2012 at 01:18 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old incarnation again