ठाणे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील लिफ्ट तांत्रिक कारणास्तव बंद पडल्याने त्यामध्ये एका रुग्णाच्या आईसह चार जण अर्धा तास अडकल्याचा प्रकार गुरुवार दुपारी घडला. या घटनेमुळे रुग्णाची आई घाबरली आणि चक्कर येऊन पडली, त्यामुळे तिला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, या वृत्ताला जिल्हा शल्य चिकित्सक रत्नाकर कुलकर्णी यांनी दुजोरा दिला आहे.
उथळसर भागात राहणाऱ्या सुंदराबाई शिंदे (६५) यांचा मुलगा आजारी असून त्याला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी त्याला भेटण्यासाठी सुंदराबाई त्यांच्या नातीसोबत रुग्णालयात आल्या होत्या. रुग्णालयाच्या लिफ्टमधून त्या, त्यांची नात, नर्स आणि एक महिला कर्मचारी, असे चौघेजण जात होते. त्या वेळी तांत्रिक कारणास्तव लिफ्ट बंद पडल्याने त्यामध्ये सुमारे अर्धा तास चौघे अडकून पडले. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी धाव घेऊन या चौघांना बाहेर काढले. मात्र, या घटनेमुळे घाबरलेल्या सुंदराबाईंना चक्कर आली, त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Story img Loader