सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या सायन-पनवेल महामार्गाच्या पुनर्बाधणीत जुन्या मार्गाची चांगलीच वाताहत झाली असून या रस्त्यावर आता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर नेरुळ येथे अध्र्या किलोमीटर भागात सीमेंट क्राँक्रीटीकरण झाल्याने हा रस्ता वाहतुकीला खुला करण्यात आला आहे.
सायन-पनवेल महामार्गावर ट्राम्बे ते कळंबोली या २३ किलोमीटर महामार्गाचे सध्या रुंदीकरण आणि क्राँक्रीटीकरण सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने १२२० कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वपूर्ण महामार्गाची पुनर्बांधणी हाती घेण्यात आली आहे. या महामार्गावरून प्रतिदिन सुमारे दोन लाख वाहने धावतात. मुंबईहून पुणे व गोव्याकडे जाणारी सर्व वाहतूक याच मार्गाने जात असून ठाण्याहून येणाऱ्या वाहतुकीसाठी हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे या महामार्गाच्या पुनर्बाधणीचे काम हाती घेणे जोखमीचे आणि जिकिरीचे असल्याचे लक्षात येत आहे. तुर्भे उड्डाण पुलाजवळ मुंबई व ठाण्याहून येणारी वाहतूक एकत्र मिळत असल्याने येथून कळंबोलीपर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. संततधार पडणाऱ्या पावसाने या महामार्गाच्या पुनर्बाधणीजवळील सर्व रस्ते वाहून नेले आहेत. त्यामुळे या मार्गावर सध्या खड्डेच खड्डे आढळून येत आहेत. त्यामुळे अगोदरच पाच पदरी रस्ता क्राँक्रीटीकरण रस्ता संकुचित झाल्याने त्यात खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालविण्याची तारेवरची करसत वाहनचालकांना करावा लागत आहे. या मार्गावर जेएनपीटीकडे जाणाऱ्या कंटेनरची संख्या जास्त आहे. त्यामुळे रस्ते खराब होण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून येते. या पुनर्बाधणीत पाच उड्डाण पूल आहेत. त्यामुळे जुईनगर, नेरुळ, खारघर, कळंबोली या ठिकाणी या उड्डाण पुलांची कामे समांतररीत्या सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी जास्त प्रमाणात होत आहे. नेरुळ येथे एमआयडीसी व वसाहतीतून निघणाऱ्या दोन पर्यायी रस्त्याची वाहूतक कोंडीच्या काळात फार मोठी मदत होत आहे. याच मार्गावर बेलापूर खिंड सपाटीकरण आणि रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. वाहतूक कोंडी होत असली तरी धीम्यागतीने वाहने पुढे सरकत असल्याने ती जास्त काळ राहत नसल्याचे दिसून येत आहे. नियोजित काळापेक्षा नऊ महिने हे का उशिराने सुरू झाल्याने या महामार्गाची पुनर्बाधणी पुढील वर्षी मेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत ही वाहतूक कोंडी व रस्त्यांची वाताहत सहन करण्याशिवाय वाहनचालकांना दुसरा पर्याय नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader