कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे श्री शाहू मार्केट यार्डामध्ये ‘बलिप्रतिपदा’ दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर साईलिला ट्रेडिंग कंपनी या अडत दुकानात बुधवारी १४ नोव्हेंबर २०१२ रोजी सकाळी ८ वाजून ३१ मिनिट या शुभमुहूर्तावर माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांच्या शुभहस्ते व समितीचे सभापती दत्तात्रय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुळाचे सौदे काढण्यात आले. सुरुवातीस समितीचे उपसभापती शामराव सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्व घटकांचे बाजार समितीच्या वतीने स्वागत करून सर्वाना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमप्रसंगी संपतबापू पवार-पाटील यांनी सर्व गूळ उत्पादक शेतकरी, बाजार समितीचेअडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार, मदतनीस व इतर सर्व घटकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या व कष्टकरी गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या गुळाला जास्तीत जास्त दर देण्यासाठी व्यापाऱ्यांना आवाहन केले.
आजच्या मुहूर्ताच्या सौद्यामध्ये गुळाचा दर प्रतिक्विंटल २८०० रुपये ते ५ हजार १५१ रुपयेपर्यंत झाला. गतवर्षांशी तुलना करता गूळ दरात थोडी वाढ झाली असल्याने गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासो देवकर, समितीचे सदस्य कृष्णराव पाटील, मारुती ढेरे, दत्तात्रय साळोखे, नामदेव पाटील, शिवाजीराव गायकवाड, शामराव भोई, दिनकर पाटील, नयन प्रसादे, अशोक बल्लाळ, समितीचे उपसचिव विजय नायकल व समितीचे अधिकारी, कर्मचारी, गूळ उत्पादक शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार, मदतनीस आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.   

Story img Loader