५० हजार लोकसंख्येच्या कबनूर गावाला गेले चार दिवस पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त नागरिकांनी इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर शनिवारी सुमारे दोन तास रास्तारोको आंदोलन केले. आंदोलन करणाऱ्या सुमारे १५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर सुटका केली. पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबले.
कबनूर (ता. हातकणंगले) येथे जलसुराज्य प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पाची सुमारे २१ लाख रुपयांची विजेची थकबाकी राहिल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. परिणामी गेल्या चार दिवसांपासून ५० हजार लोकसंख्येच्या कबनूर गावाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दरमहा १३० रुपये असणारी पाणीपट्टी वेळेत न भरल्यास पाणीपुरवठा खंडित केला जातो. मात्र गेले चार दिवस गावाला पाणीपुरवठा का केला जात नाही, यावरून ग्रामस्थ संतप्त झाले.
शनिवारी दुपारी इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावरील कबनूर गावात रत्नाप्पाण्णा कुंभार अचानक रास्तारोको आंदोलन सुरू झाले. पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरल्याबद्दल जलसुराज्य प्रकल्पाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पोलीस व आंदोलक यांच्यात झटापट निर्माण झाली. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी शंखध्वनी करीत पाणीपुरवठा झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. यामुळे कोल्हापूर-इचलकरंजी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
आंदोलकांशी बोलताना जलसुराज्य प्रकल्पाचे अध्यक्ष मनोहर मणेरे यांनी थकीत वीज बिल न भरल्याने पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही, असे स्पष्ट करीत आज थकबाकी भरल्यामुळे उद्या रविवारपासून पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे सांगितले. तथापि आंदोलक मात्र त्वरित पाणीपुरवठा सुरू झाल्यशिवाय रास्तारोको आंदोलन बंद करणार नाहीत, असे सांगत राहिले. विशेषत: महिला अधिक आक्रमक होत्या. सुमारे दीड तासानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दुर्योधन पवार यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक आपल्याच मागणीला चिकटून राहिले होते. कबनूरचे नेते, जलसुराज्य प्रकल्पाचे प्रणेते सुधाकर मणेरे यांनी वाढीव वीज बिलामुळे थकबाकी वाढत चालली आहे. राज्य शासनाकडून प्रोत्साहन योजनेतून अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
मणेरे यांच्या आश्वासनानंतरही आंदोलन न थांबल्याने दुर्योधन पवार यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर मार्ग निघाला. आज पाणीपुरवठा सुरू न झाल्यास रविवारी गाव बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. दोन तास सुरू असलेल्या आंदोलनात मुमताज हेगडे, अक्काताई चव्हाण, शांता शेलार, नफीसा शेखजी, मारुती पोवार, रफिक शेख, संजय कट्टी यांच्यासह ग्रामस्थांचा समावेश होता.
इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर पाणीप्रश्नी रास्ता रोको
५० हजार लोकसंख्येच्या कबनूर गावाला गेले चार दिवस पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त नागरिकांनी इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर शनिवारी सुमारे दोन तास रास्तारोको आंदोलन केले. आंदोलन करणाऱ्या सुमारे १५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर सुटका केली. पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबले.
First published on: 29-12-2012 at 09:01 IST
TOPICSरास्ता रोको
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On ichalkaranji kolhapur road rasta roko for irregular water supply