राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी), भटक्या व विमुक्त (व्हीजेएनटी) विद्यार्थ्यांची गेल्या दोन वर्षांपासून थकित असलेली शिष्यवृत्ती मिळावी या मागणीसह अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. सरकारने आंदोलनाची दखल घेत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबतचा निर्णय त्वरित घ्यावा अन्यथा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारवर दबाव आणण्यात येईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालेल्या आंदोलनात प्रारंभी विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही मात्र दुपारनंतर विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागली. आमदार देवेंद्र फडणवीस यांनी दीपप्रज्वलन आणि भारतमातेच्या प्रतिमेला हार घालून ठिय्या आंदोलनाला प्रारंभ केल्यानंतर अनेक युवक-युवतींची सरकारचा निषेध करणारी भाषणे झाली. घोषणांनी आणि देशभक्ती गीतांनी जिल्हाधिकारी परिसर दुमदुमून गेला.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील ‘ओबीसी’ व ‘व्हीजेएनटी’ विद्यार्थ्यांना ११०० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती राज्य सरकारने वितरित केलेली नाही. शिष्यवृत्तीअभावी विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे. या गंभीर विषयाबाबत राज्य सरकार संवेदनशील नाही.
या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने सुरू केलेली ही महत्त्वाकांक्षी योजना शिष्यवृत्ती वितरणात विलंब करून हळूहळू बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
 राज्य सरकारने ‘ओबीसी’ व ‘व्हीजेएनटी’ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तातडीने वितरित करावी, शिष्यवृत्तीचे नवे दर आणि बी.बी.ए., बी.सी.ए. , बी.सी.सी.ए. आणि इतर नवीन अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यासंबंधी केंद्र सरकारने ११ ऑगस्ट २०११ रोजी राज्याला कळविलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, ओबीसीची संपन्न गटाची उत्पन्न मर्यादा ७ लाख रुपये करण्यात यावी, ईबीसी सवलतीसाठी उत्पन्न मर्यादा ४ लाख ५० हजार रुपये करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी आमदार नाना पटोले, शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे, महापौर अनिल सोले, चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख, विकास कुंभांरे, सुधीर पारवे, प्रवीण दटके, प्रभाकर येवले, दयाशंकर तिवारी, उपमहापौर संदीप जाधव, अविनाश ठाकरे, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त छोटू भोयर, प्रा. प्रमोद पेंडके, बंडू राऊत, अश्विनी जिचकार, भाजयुमोचे अध्यक्ष बंटी कुकडे, सुरज लोलगे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाला तिरळे कुणबी सेवा मंडळ, बावणे कुणबी समाज, खेडूला कुणबी समाज, धनोजे कुणबी समाज, अखिल भारतीय कुणबी समाज, तिरळे कुणबी समाज, मराठा सेवा संघ, वीर भगतसिंह विद्यार्थी सेवा परिषद, महाराष्ट्र सुवर्णकार व माळवी सुवर्णकार संस्था आणि राज्यातील इतरही मागासवर्गीय संघटनांनी पािठंबा दिला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.      
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे दोन दिवस आयोजित केलेल्या ठिय्या आंदोलनात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आज सकाळी प्रारंभी विद्यार्थ्यांची संख्या बघता त्यांना थांबवून ठेवण्यासाठी भाजयुमोच्या काही कार्यकर्त्यांनीच देशभक्तीगीते सादर केली. काही विद्यार्थ्यांनी विनोदी किस्से सांगून उपस्थिांचे मनोरंजन केले. विद्यार्थ्यांसाठी परिसरात पिण्याची पाण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थी भोजन करून आपआपल्या घरी परतले.  

Story img Loader