चिंचवडच्या आनंदनगर भागातील पालक संतप्त
नव्याने बसवण्यात आलेला ट्रान्सफार्मर जळाल्याने चिंचवड येथील आनंदनगर परिसरातील वीजपुरवठा गेल्या चार दिवसांपासून खंडीत आहे. त्यामुळे या भागातील नागरिक अंधारात आहेत. बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि दहावीच्या सुरू होणार असल्याने विद्यार्थी चार दिवसांपासून अंधारात आहेत. अनेकांनी वारंवार तक्रार करून वीज कंपन्यांकडून थंडा प्रतिसाद असल्याने पालक संतप्त झाले आहेत.
चिंचवड स्टेशनला आनंदनगर ही मोठी वसाहत आहे. वाढलेली लोकवस्ती लक्षात घेत अलीकडेच या भागासाठी नवीन ट्रान्सफार्मर बसवण्यात आला. पाच महिन्यांपूर्वी तो नादुरुस्त झाला होता, तेव्हाही वीज कंपनीने दुर्लक्ष केले होते. चार दिवसांपूर्वी पुन्हा ट्रान्सफार्मर जळाला, याविषयी नागरिकांनी स्थानिक नगरसेवक प्रसाद शेट्टी यांना कल्पना दिली. त्यांनी वीज कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली व वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली. तथापि, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले, तेथेही तोच अनुभव आला. त्यानंतर, शेट्टी यांनी पालिकेतील सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम व स्थानिक आमदार अण्णा बनसोडे यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला. ‘करतो-करतो’ म्हणाले. मात्र, त्यांनीही काहीच केले नाही. अधिकारी थकबाकीचे व अन्य तांत्रिक मुद्दे उपस्थित करत आहेत, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. या भागातील नागरिक चार दिवसांपासून अंधारात आहेत.
परीक्षांचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तातडीने वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास आंदोलन करण्याच्या मनस्थितीत नागरिक आहेत. तर, या प्रकरणी अजितदादांकडे तक्रार करणार असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा