सध्याच्या काळात वेगवेगळ्या माध्यमांचा प्रभाव वाढला आहे, अशा परिस्थितीत रसिकांना आवडेल आणि रुचेल असे बदलणारे व प्रभावी साहित्य निर्माण झाले पाहिजे आणि तसा प्रयत्न लता गुठे यांच्या ‘मी आहे तिथे’ या कवितासंग्रहातून तसेच ‘चेरी लॅण्ड’ व ‘ताऱ्यांचे जग’ या नियतकालिकातून दिसून येत असल्यामुळे त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असे विचार ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी व्यक्त केले.
भरारी क्रिएशन्स या संस्थेतर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. उषा मेहता, महेश केळुस्कर, रविराज गंधे, माधवी कुंटे, डॉ. सुनील सावंत, वाल्मिक गुठे, व्यंगचित्रकार विकास सबनीस आदी मान्यवर या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते.
लहान मुलांना अकाली प्रौढत्व आल्याचे अभ्यासकांना जाणवते, त्यामुळे त्यांना पारंपरिक साहित्य देण्यापेक्षा त्यांना रुचेल असे साहित्य मिळाले पाहिजे, दुर्दैवाने त्याची दखल कुणी घेत नाही, त्यामुळेच नव्याने प्रकाशित होत असलेल्या ‘चेरी लॅण्ड’ या मासिकाने ही गरज भागवावी, असे आवाहन कवी महेश केळुस्कर यांनी केले.
आपले मनोगत व्यक्त करताना लेखिका लता गुठे यांनी अनेक वर्षांच्या नियोजनातून आपल्याकडून ही साहित्यकृती प्रत्यक्षात आली आणि त्यासाठी कार्य करणारी समविचारी मंडळी भेटली. मात्र आता यापुढे रसिकांनी जबाबदारी घ्यावी, असे सांगितले. चांगल्या साहित्यकृतीसाठी आम्हाला सुचवावे तसेच त्याचे स्वागतही करावे म्हणजे अधिकाधिक दर्जेदार साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असेही त्या म्हणाल्या.
अध्यक्ष म्हणून बोलताना उषा मेहता यांनी साहित्य यांनी साहित्य क्षेत्रातील नावीन्यता तसेच होणारे बदल विशद केले. त्याचबरोबर साहित्य क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी रसिकांचाही फार मोठा वाटा असून आपली जबाबदारी जाणली पाहिजे व साहित्यकृती आणि साहित्यिक यांना प्रोत्साहित केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा