नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या निकृष्ट इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी दोन वाढीव चटई निर्देशांक देण्याच्या सिडकोने तयार केलेल्या प्रस्तावावरून पालकमंत्री गणेश नाईक यांनी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे समजते. आम्ही इथे अडीच एफएसआय मागत असताना तुम्ही मात्र दोनचा एफएसआय प्रस्तावित करून आम्हाला अडचणीत आणत आहात, अशा शब्दात नाईक यांनी हिंदुराव यांना नागपूर येथील त्यांच्या बंगल्यावर दोन वेळा बोलावून सुनाविल्याचे समजते. या बैठकीत अतिरिक्त भाडेपट्टय़ाचा विषयही घेतला गेला होता.
नवी मुंबईत सध्या वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक अर्थात एफएसआयच्या प्रश्नाने राजकीय वातावरण ढवळून काढण्यास सुरुवात केली आहे. शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींना अडीच, गावातील घरांना चार आणि झोपडय़ांना तीन एफएसआय मिळावा यासाठी नवी मुंबई पालिकेने तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. हा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन असतानाच इकडे सिडकोने त्यांनी बांधलेल्या, पण नंतर मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी दोन एफएसआयच्या मागणीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याचबरोबर भाडेपट्टा (लीज प्रीमियम) दुप्पट करण्याचाही प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, हे दोन्ही महत्त्वपूर्ण प्रस्ताव नागपूरमध्ये होणाऱ्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीच्या विषयपटलावर चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. मंगळवारी ही बैठक उशिरापर्यंत चालली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे व नगरविकास विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे मुख्यमंत्र्यांकडील बैठकीत व्यस्त असल्याने बैठकीला विलंब झाला. त्यामुळे एफएसआयचा विषय पहिल्या दिवशी चर्चेला घेता आला नाही. त्यामुळे तो बैठकीच्या दुसऱ्या दिवसाच्या विषयसूचीवर घेतला जाणार होता असे समजते. नवी मुंबईतील सिडकोने बांधलेल्या निकृष्ट इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी दोन एफएसआयचा प्रस्ताव सिडकोने नागपूर येथील बैठकीत आणला असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना कळताच त्यांनी तातडीने हिंदुराव यांना सोमवारी रात्री बोलवून घेतले. पालिकेने अडीच एफएसआयचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविलेला असताना सिडको दोन एफएसआयचा प्रस्ताव कसा काय तयार करू शकते, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला. असा विरोधाभास निर्माण करणारा प्रस्ताव तयार करून तुम्ही आम्हाला अडचणीत आणत आहात, (याच मुद्दय़ावरून नाईक यांनी तीन निवडणुका लढविल्या आहेत.) असेही नाईक यांनी सुनाविले. त्यावर हा प्रस्ताव मागे घेणार असल्याचे हिंदुराव यांनी त्यांना सांगितले असल्याचे कळते. या संदर्भात हिंदुराव यांच्याशी संपर्क साधला असता हा विषय चर्चेला आला की लगेच सिडकोच्या पीआरओकडून तुम्हाला सांगतो अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. नाईक यांनी आपल्याला या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलवले होते का, असे विचारले असता अजून त्यांचे म्हणणे मला कळले नाही, ते कळल्यावर तुम्हाला सांगण्याची व्यवस्था करतो अशा शब्दात या विषयावर बोलण्याचे त्यांनी टाळले. अधिवेशन असल्याने मी बोलू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अडीच एफएसआयशिवाय या इमारतींचा पुनर्विकास होणार नाही, असे शहरातील वास्तुविशारदांचे मत आहे. सिडकोने या इमारती चांगल्या बांधल्या नाहीत म्हणून हा वाढीव एफएसआयचा प्रश्न उद्भविला आहे. अडीच एफएसआय द्यायचा नसेल, तर सिडकोनेच या इमारतींचा पुनर्विकास करावा, या इमारतींचा चांगल्याप्रकारे पुनर्विकास करण्यासाठी अडीच एफएसआयची नितांत गरज आहे. त्यामुळेच विकासक या इमारतींचा पुनर्विकास करू शकणार आहे. हे करीत असताना रहिवाशांवर कोणताही भरुदड पडणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे आणि हे केवळ अडीच एफएसआयने शक्य होणार असल्याचे शहरातील वास्तुविशारद अनुराग गर्ग यांनी स्पष्ट केले.