अन्य इच्छुकांमध्ये मात्र डावलल्याचा सूर!
भाजप जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार बबनराव लोणीकर यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. जिल्हाध्यक्षपदी निवड होण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे. पक्षाच्या किसान मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्षही आहेत.
लोणीकरांचे पुत्र राहुल लोणीकर जिल्हा परिषद उपाध्यक्ष, तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. लोणीकर यांच्यासह १२जण भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक होते. बबनरावांची वर्णी या पदावर लागली. जालना बाजार समितीचे उपसभापती रामेश्वर भांदरगे, जालना नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष, तसेच पक्षाच्या जालना शहर शाखेचे माजी अध्यक्ष व भाजयुमो, अभाविप आदी संघटनांचे जिल्हाध्यक्ष राहिलेले विलास नाईक हेही या पदासाठी इच्छुक होते. शिवाय माजी जि. प. सदस्य बळीराम कडपे, माजी जि. प. सभापती रमेश गव्हाड, पक्षाचे जुने एकनिष्ठ पुढारी मुरलीधर पाटील चौधरी यांच्यासह इतर एकूण ११ जणांनी जिल्हाअध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, एका इच्छुकाने सांगितले की, ११जणांना उमेदवारी अर्जही देण्यात आले नव्हते. परंतु लोणीकरांसह सर्वांच्या मुलाखती खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत निवडणूक निरीक्षक एकनाथ जाधव, जिल्हा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांनी घेतल्या. मुलाखती संपल्यावर दानवे यांच्यासोबत येऊन निरीक्षकांनी अध्यक्षपदी लोणीकर यांची निवड झाल्याचे जाहीर केले. मुरलीधर चौधरी यांनी सांगितले की, आपण अध्यपदासाठी इच्छूक होतो. परंतु निवडणूक निरीक्षकांनी आपणास उमेदवारी अर्जच दिला नाही. इतर इच्छुकांनाही उमेदवारी अर्ज दिले नाहीत. १०-१२जण इच्छूक असूनही निवडणूक निरीक्षकांनी हुकूमशाही पद्धतीने नवीन जिल्हाध्यक्षांचे नाव जाहीर केले. आणखी एक इच्छूक उमेदवार बळीराम कडपे यांच्याशी संपर्क साधला असता, उमेदवारी अर्ज दिले नाहीत, हे खरे आहे. परंतु बिनविरोध म्हणजे सर्वसंमतीने नवीन अध्यक्षांचीच निवड झाल्याचे जाहीर केले. यात लोकशाही कुठे आहे? असा प्रश्नही कडपे यांनी उपस्थित केला.निवडणूक निरीक्षक एकनाथ जाधव यांनी सांगितले की, सर्व इच्छुकांशी चर्चा केल्यानंतर आणि अन्य प्रमुख अधिकाऱ्यांशी बोलणी केल्यानंतर लोणीकर हेच योग्य अध्यक्ष राहतील, असा विचार समोर आला. १०-१२जण इच्छूक होते. परंतु त्यांनी कोणीही उमेदवारी अर्जाची मागणी केली नाही. त्यामुळे एकमताने लोणीकर यांच्या नावावर एकमताने निर्णय झाल्यानंतर अन्य कोणी उमेदवारी अर्ज मागण्याचा प्रश्न आला नाही. नवनिर्वाचित अध्यक्ष लोणीकर यांनी सांगितले की, जवळपास ९जणांनी अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली होती. या सर्वाचे म्हणणे निवडणूक निरीक्षक व पक्षातील वरिष्ठांनी ऐकून घेतले. त्यावेळी मी तेथे उपस्थित राहणे योग्य नव्हते. जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांशीही निरीक्षकांनी चर्चा केली. नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया दोन तास चालली. निरीक्षकांच्या इच्छेनुसार नवीन अध्यक्ष जाहीर करावयाचा असता तर ही प्रक्रिया २ तास कशासाठी चालली असती, असा सवालही लोणीकर यांनी केला.