आपल्या स्मारकासाठी जागा मिळवताना कुणी अरेरीव केल्याचे खुद्द बाळासाहेब ठाकरे यांना समजले असते, तर ते कसे गरजले असते, याची कल्पनाही न केलेली बरी. गरवारे बालभवनच्या जागेपैकी काही भाग स्मारकासाठी घेण्याचा डाव पालक आणि शिक्षकांच्या संतापाने तात्पुरता मिटला असला, तरी असे घडणे हे पुण्याला शोभादायक नाही. एक चांगले काम सातत्याने काही काळ सुरू आहे, याचा किती त्रास नगरसेवकांनी करून घ्यावा, याला काही धरबंध? गरवारे बालभवन हे मुलांसाठी सुरू असलेले काम असेच नगरसेवकांच्या डोळ्यात सतत खुपत असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी बालभवनमधील काही जागा हिसकावण्याचा हा त्यातलाच एक प्रकार आहे. शहरातील पालिकेच्या किती आरक्षित जागांवर काय काय बांधकाम झाले आहे आणि त्याला कोणाचा आशीर्वाद आहे, हे जगाला ठाऊक आहे. मोकळी जागा हा आपला खासगी हक्क असल्याच्या थाटात शहरातील सगळ्या जागांवर झडप घालणाऱ्यांना गरवारे बालभवनची जागा खुपणे स्वाभाविकच आहे. ठाकरे यांच्या स्मारकाची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नगरसेवक अशोक हरणावळ यांना स्पष्टपणे विचारण्यात आले होते की, या प्रस्तावित स्मारकासाठी बालभवनची जागा डोळ्यासमोर आहे काय? तेव्हा साळसूदपणे नाही, असे उत्तर देणाऱ्या हरणावळ यांनी बालभवनच्या जागेत जाऊन काही भाग देण्यासाठी अरेरावी के ल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पालक आणि चालक यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हा प्रश्न तात्पुरता सुटला असल्याचे दिसत असले तरीही त्यामुळे अशा नव्या आशादायी शैक्षणिक प्रयोगांवर सततची तलवार टांगली जाते, हे लक्षात घेतले पाहिजे. महापालिकेच्या शाळांमधील मुलांना घरात आणि शाळेत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातील बऱ्याचशा मानसिक स्वरूपाच्या असतात. अशा मुलांना मानसिक सल्ल्याची फार आवश्यकता असते. असा प्रयोग पालिकेच्या शाळांमध्ये गेली काही वर्षे सुरळीत सुरू होता. त्यावेळचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी आणि त्यानंतरचे सगळे आयुक्त यांना या योजनेचे महत्त्व कळले होते, पण नगरसेवकांना हा चांगला प्रयोग खुपू लागला आणि त्यांनी त्वरेने तो बंद पाडण्यासाठी बाह्य़ा सरसावल्या. प्रत्येक कामात टक्केवारीचाच हिशोब करणाऱ्यांकडे त्या कामाचे मूल्यमापन करण्याएवढी क्षमता नसते. आपल्याच वॉर्डातील मुलांना कुणीतरी मानसिक आधार देते आहे, याची जाणीव ठेवण्याऐवजी या कामाचे परिणाम कागदावर सिद्ध करण्याच्या नादात त्याविरुद्ध कागाळ्या करण्यातच अनेकांना रस वाटू लागला. चांगले काम करणाऱ्या प्रत्येकाला पालिकेकडून इतकी हीन प्रकारची वागणूक मिळते की कुणाला तेथे जाऊन काही करावे, असे वाटूच नये. गरवारे बालभवनच्या बाबतही सातत्याने असेच घडते आहे. मागे पर्वतीवर जाण्यासाठी रोप वे उभारण्याचा विचार सुरू झाला, तेव्हाही बालभवनच्या जागेवरच सगळ्यांचा डोळा होता. अशा संस्थांना सतत भीतीच्या छायेत ठेवून त्यांना पळवून लावण्याचा हा घाट शहराच्या सांस्कृतिक हीनतेचे दर्शन घडवणारा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होण्यास कोणत्याही राजकीय पक्षाने विरोध करता कामा नये. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन हे पुण्याचे वैशिष्टय़ ठरू शकते. असे स्मारक उभे करताना कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये, याची काळजी घेण्यास मात्र नगरसेवक विसरले. ठाकरे यांच्या कर्तृत्वाला शोभेल असे स्मारक उभारण्यासाठी सारसबागेसमोरची कोठीची जागाच फक्त योग्य आहे, असेही समजण्याचे कारण नाही. त्यापेक्षा अनेक पटींनी चांगल्या जागा शोधणे शक्य आहे. परंतु प्रश्न जेव्हा प्रतिष्ठेचा होतो, तेव्हा सारे काही अंधारून जाते. ठाकरे यांच्या नावाशी असल्या प्रकारचा वाद चिकटला जाणे दुर्दैवी असले, तरी त्याची जबाबदारी घ्यायला मात्र कुणाचीही तयारी नाही. पुण्यातील अशा स्वरूपाच्या अनेक प्रकल्पांना अभय मिळण्यासाठी काहीतरी कायमस्वरूपी व्यवस्था उभी करणेच शहाणपणाचे ठरणार आहे.
– मुकुंद संगोराम
mukund.sangoram@expressindia.com
पुन्हा बालभवन
आपल्या स्मारकासाठी जागा मिळवताना कुणी अरेरीव केल्याचे खुद्द बाळासाहेब ठाकरे यांना समजले असते, तर ते कसे गरजले असते, याची कल्पनाही न केलेली बरी. गरवारे बालभवनच्या जागेपैकी काही भाग स्मारकासाठी घेण्याचा डाव पालक आणि शिक्षकांच्या संतापाने तात्पुरता मिटला असला, तरी असे घडणे हे पुण्याला
First published on: 21-02-2013 at 02:49 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once again balbhavan