उन्हाळा संपून आठ दिवसांवर पावसाळा आला असताना शहरातील विविध भागात पाणी समस्या कायम असून महापालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्यामुळे पाण्याच्या समस्येवर सत्तापक्षासह विविध पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासन आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सला पुन्हा एकदा ‘टार्गेट करून कंत्राट रद्द करण्याची मागणी केली. ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सला आयुक्तांनी नोटीस बजावल्यानंतरही गेल्या दहा दिवसात कुठलीच सुधारणा झाली नाही आणि पाण्याची समस्या ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे कंपनीला अजून एकदा नोटीस देऊन त्यांना ताकीद द्यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश महापौर अनिल सोले यांनी आयुक्तांना दिले. आयुक्तांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.
विविध समित्यांची निवड प्रक्रिया आटोपल्यावर प्रश्नोत्तराचा तासाला सुरुवात करण्यापूर्वी विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे यांनी पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्याचा आग्रह धरीत ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सवर गेल्या दहा दिवसात कुठली कारवाई केली अशी विचारणा प्रशासनाला केली. त्यानंतर एकेक करीत विरोधी पक्षासह सत्ता पक्षातील काही नगरसेवकांनी पाण्याच्या प्रश्नावरून प्रशासनाला आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सला चांगलेच धारेवर धरले. महापालिका प्रशासन ओसीडब्ल्यूवर कुठलीच कारवाई करीत नसेल तर पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही का असा प्रश्न विकास ठाकरे यांनी उपस्थित केला. नेटवर्क आणि नॉननेटवर्क भागात पाण्याची समस्या कायम आहे. ओसीडब्ल्यूकडे २९७ टँकरची व्यवस्था असताना शहरात टँकरद्वारे पाणी पुरवठा का केला जात नाही. पाण्याच्या प्रश्नाचे गांभीर्य प्रशासनाला नसल्यामुळे ते अधिकाऱ्यांवर कुठलीच कारवाई करीत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. नगरसेवकांमुळे ओसीडब्ल्यूच्या कामात अडथळा आणला जात आहे, असा आरोप केला जात असून हा आरोप करणाऱ्यांनी सभागृहात येऊन चर्चा केली पाहिजे, असे आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनी ओसीडब्ल्यूच्या कामावर नाराजी व्यक्त करीत टँकरद्वारे पाणी पुरवठा व्यवस्थेत मोठा घोळ असल्याचा आरोप केला. शहरातील पाणी समस्येला ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स जबाबदार असल्याचा आरोप करीत त्याचे कंत्राट रद्द करण्यात यावे, अशी मागणी यावेळी सभागृहात करण्यात आली.
शहरातील अनेक भागातील जलसंकट, दूषित पाण्याची तक्रार करूनही उपाययोजना न होणे, ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सची निरुपयोगिता, अधिकाऱ्यांचे असहकार्य आणि बेजबाबदारपणा, कमी दाबाने पुरवठा, विहिरी बोरिंगची दुरवस्था, टिल्लु पंप जप्तीची कारवाई, पाईप लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेले रस्ते आणि त्याची न केलेली दुरुस्ती आदी विविध प्रश्नांकडे नगरसेवकांनी लक्ष वेधून जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांना वारंवार सूचना दिल्यावर काम केले जात नाही. ज्या भागात भरपूर पाणी पुरवठा होतो त्या भागात ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सने काम केल्यावर कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू झाला, असा आरोप यावेळी करण्यात आला. महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे अधिकारी नगरसेवकाचे ऐकत नाही आणि संपर्क करीत नाही, असा आरोप करण्यात आला. प्रकाश गजभिये, कामील अंसारी, सुरेश जग्यासी, प्रफुल गुडधे, अविनाश ठाकरे, प्रशांत धवड, गुड्डू तिवारी आदी सदस्यांनी आपापल्या प्रभागातील आणि वस्त्यांमधील पाण्याच्या समस्या मांडून ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स आणि प्रशासनाला धारेवर धरले.