शहरात चोरटय़ांनी पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली असून, सोमवारी मध्यरात्री दिंडोरी रोड परिसरात ८ मोटारींच्या काचा तोडून त्यामधून काही कारटेप चोरून नेले. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरी रोडवरील जुना पेट्रोलपंप परिसरात सोमवारी मध्यरात्री तीन वाजेनंतर हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. काही महिन्यांपूर्वी याच परिसरात वाहनांची जाळपोळ करण्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा हा परिसर चर्चेत आला. आरटीओ कॉर्नर ते स्नेहनगर परिसरात चोरटय़ांनी धुमाकूळ घातला. परिसरातील घुगे पार्क, यशवंत मंगल कार्यालयाशेजारील इमारतीबाहेर उभ्या असणाऱ्या चारचाकी त्यांच्या लक्ष्य ठरल्या. इमारतींखाली व रस्त्यावर उभ्या असणाऱ्या चारचाकी मोटारींच्या काचा चोरटय़ांनी फोडल्या. ज्या ज्या वाहनांमध्ये कारटेप आढळून आल्या, ते चोरटय़ांनी लंपास केले. कॉलन्यांमध्ये उभ्या असणाऱ्या जवळपास आठ कारची मोडतोड करण्यात आली.
त्यातील काही कारमधील ‘सीडी प्लेअर’ चोरटय़ांना काढता आले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांची मोडतोड केली. पहाटेच्या सुमारास हा प्रकार काही जणांच्या लक्षात आला. त्यानंतर काही वेळातच या घटनेची माहिती परिसरात पसरली आणि नागरिक रस्त्यावर आले. दरम्यानच्या काळात स्थानिक नगरसेवक गणेश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली.
वाहनांच्या काचा तोडताना चोरटय़ांनी एकसमान पद्धत वापरली होती. क्लीनर बाजूकडील काचा तोडून त्यातील कारटेप व सीडी प्लेअर चोरणे, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. या घटनेत सौरव आहेर, धनंजय महाले, अतुल पाटील, विश्वास अग्निहोत्री, अकबर तांबोळी, महेश आव्हाड, अजय सरोदे आणि देवीदास यांच्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी चोरटय़ांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरटय़ांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नगरसेवक चव्हाण यांनी केली आहे. या परिसरात पोलिसांची गस्त होत असली तरी ते प्रमाण कमी आहे. वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार मध्यरात्री दोननंतर घडला असावा. कारण, याच परिसरात वास्तव्यास असणारे एक जण रात्री दोनच्या सुमारास घरी परतले होते. तेव्हा असा कोणताही प्रकार घडला नव्हता. या बाबतची माहिती चव्हाण यांनी दिली.
नाशकात पुन्हा चोरटय़ांचा धुमाकूळ
शहरात चोरटय़ांनी पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली असून, सोमवारी मध्यरात्री दिंडोरी रोड परिसरात ८ मोटारींच्या काचा तोडून त्यामधून काही कारटेप चोरून नेले. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published on: 24-04-2013 at 02:57 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once again robbery cases in nashik