जिल्ह्य़ात तापमानाने उच्चांक गाठला असून सलग दुसऱ्या दिवशीही पारा ४८ अंश सेल्सिअसच्या आसपासच असल्याने लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. काही स्वयंसेवी संस्था, तसेच खगोल अभ्यासकांच्या मते काल सोमवार आणि आज मंगळवारचे तापमान ४८.२ डिग्री आहे. तशी नोंदही घेतली असल्याची माहिती लोकसत्ताला दिली.
नवतपा सुरू होण्याच्या पूर्वीपासूनच सूर्याने अक्षरश: आग ओकायला सुरुवात केली आहे. विदर्भात सर्वदूर उष्णतेची लाट असून काल सोमवारी जेथे या शहरात ४८ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानाची नोंद घेण्यात आली तेथे आज मंगळवारीही तापमान तेवढेच नोंदले गेले. ही उष्णतेची लाट रविवारपासूनच सुरू झाली आहे. रविवारीही शहरातील तापमान ४७.९ अंशावर होते. या रणरणत्या उन्हातही काही प्रमाणात का होईना लोकांची रस्त्यावर गर्दी बघायला मिळायची. मात्र, पारा ४८ अंशाजवळ पोहोचताच लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. दुपारी एक दीड वाजताच्या सुमारास एखाद व्यक्तीच रस्त्याने जातांना दिसते. ऐरवी कडक उन्हात शहरातील मुख्य रस्ते संचारबंदी लागल्यासारखी स्थिती झालेली आहे. मुख्य बाजारपेठेपासून इतर वस्तूंची दुकाने अक्षरश: बंद बघायला मिळत आहेत. या उन्हाला लोक अक्षरश: घाबरले आहेत. उन्हाची तीव्रता कमी झाली की, सायंकाळी सात वाजतानंतर शहरातील सर्व रस्ते हाऊसफुल्ल दिसतात.
नवतपा सुरू होण्यापूर्वीच या शहरात उन्हाने कहर केलेला आहे. येत्या २५ मे पासून २ जूनपर्यंत नवतपा राहणार आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांना आणखी किमान पंधरा दिवस तरी अशा रणरणत्या उन्हाचे चटके सहन करत दिवस काढावे लागणार आहे. उन्हामुळे दुपारच्या नागपूर, गडचिरोली, वर्धा व यवतमाळ या बसफेऱ्या सुध्दा कमी झालेल्या आहेत. ज्या कुणाला नागपूरला जायचे तो पहाटेच निघून जातो. त्यामुळे एस.टी. महामंडळाचा खर्च कमी करण्यासाठी म्हणून उन्हाळ्यातील दुपारच्या फेऱ्या कमी केल्या आहेत. शहरातील काही स्वयंसेवी संस्थेच्या मते पारा ४८ अंश सेल्सिअसपेक्षा कितीतरी जास्त आहे. मात्र, शासनाच्या वतीने त्याची नोंद घेतली जात नाही.
ग्रीन प्लॅनेट सोसायटी व स्काय वॉच ग्रुपचे सुरेश चोपणे यांनी तर शहरातील काही भागात ४८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेतल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ, या शहरातील तापमान यावर्षी किमान ४८ अंशावर सातत्याने गेले आहे. केवळ वेकोलिच्या कोळसा खाणी व ऊर्जा प्रकल्पांमुळेच या शहरातील उष्णतेत दरवर्षी वाढ होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. एवढय़ा प्रचंड उष्णतामानात चंद्रपूरवासीय दिवस काढत आहेत.