जिल्हा प्रशासन व नगर पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात भीषण पाणीटंचाईने कहर केला आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या शहराला पंचवीस दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत. महिन्यातून केवळ एकदा सार्वजनिक पाणीपुरवठा होणारे बुलढाणा हे राज्यातील एकमेव जिल्हा मुख्यालय आहे. भीषण पाणीटंचाईची हीच संधी साधून खासगी टँकर्सवाल्यांनी पाण्याचे भाव दुप्पट तिप्पट करीत नागरिकांची वारेमाप लूट चालविली आहे, असा आरोप  करून लुटीला प्रतिबंध करावा व शहराला मुबलक पाणी द्यावे, अशी मागणी युवा ग्रुपने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.

 खासगी टँकरवर जिल्हा व नगर प्रशासनाचे नियंत्रण नसल्यामुळे त्यांची मनमानी वाढली आहे. शहरात दिवसाआड पाण्याची भाववाढ करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा उधळावा लागत आहे. ही परिस्थिती युवा ग्रुपने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत आठ दिवसाआड पाणी पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.
 शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण गत तीन महिन्यांपासून कोरडे पडले आहे. त्यामुळे शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सद्याच्या स्थितीत शहराला पेनटाकळी व येळगाव धरणातील बोअरवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मुबलक पाणी असतानादेखील केवळ पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. पालिकेने  पाण्यासाठी वाऱ्यावर सोडलेले बुलढाणा हे राज्यातील एकमेव मुख्यालय आहे.
शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा सर्वाधिक फायदा खासगी टँकरधारक घेऊन नागरिकांची वारेमाप आर्थिक लूट करीत आहेत. शहरात चार हजार लिटर साठी १००० रुपये, व दोन हजार लिटर पाण्यासाठी ६०० रुपये व एक हजार लिटर पाण्यासाठी ३०० रुपये मोजावे लागत आहेत. पाण्याची ही महागाई जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी   आहे, असा आरोप युवा ग्रुपने केला आहे.
टंचाईग्रस्त नागरिकांची पाण्यासाठी होणारी हेळसांड थांबविण्यासाठी शहर व परिसरातील बोअर व विहिरी अधिग्रहित करण्यात याव्या तसेच खासगी टँकरची निर्धारित किंमत लावून शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी युवा ग्रुपचे गणेश भोसले, अमृत पंडित, अंकुश गायकवाड, संदीप तोंडे, आशिष शर्मा, पप्पू सुले, किशोर नरवाडे, अमोल देशपांडे, विजुआप्पा कुली व संतोष आमले यांनी केली आहे.

Story img Loader