जिल्ह्य़ात १९७२ पेक्षा भयंकर स्थिती आहे. खरीप-रब्बी हंगाम पूर्णत: वाया गेले. अशा वेळी सरकार भेदभाव करीत आहे. नगरसाठी सव्वाशे कोटींची मदत जाहीर करणाऱ्या राज्य सरकारने उस्मानाबादच्या तोंडाला अवघे २० कोटी देऊन पाने पुसली. उस्मानाबादसह मराठवाडय़ावर होत असलेला अन्याय यापुढे सहन करणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र गायकवाड यांनी दिला.
पाणी, चारा, शैक्षणिक शुल्कमाफी, वीजबिल व कर्जवसुली थांबवावी आदी मागण्यांसाठी राष्ट्रीय महामार्गावर महायुतीच्या वतीने गुरुवारी दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक दुपारी दोनपर्यंत विस्कळीत झाली होती. सरकारच्या तुटपुंज्या अनुदानात जनावरांच्या छावण्या चालविणे अवघड झाले आहे. यापुढे दावणीवर चारापाणी पुरवावे अथवा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावे. उस्मानाबाद पाणीयोजनेसाठी २५ कोटी, तसेच उमरगा शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ५ कोटी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, यातील छदामही उमरगा शहराला मिळाला नाही. त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर आहे. माकणी धरणातील पाणी येईपर्यंत शहराला टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी वारंवार करूनही पूर्ण होत नाही. मराठवाडय़ात दुष्काळाची सर्वाधिक तीव्रता उस्मानाबाद जिल्ह्य़ात आहे. मात्र, याची दखल घेतली जात नाही, असे सांगून महायुतीच्या वतीने या साठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गायकवाड यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा