धोम धरणालगत मुगाव येथे सुरू असलेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या हिंदी चित्रपटाच्या सेटवर जाऊन निर्मात्याला वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाई पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वाई पोलिसांनी सांगतिले की, बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता शाहरूख खान यांच्या रेड चिली इंटरटेन्मेंट प्रॉडक्शन या कंपनीकडून मुगाव (ता. वाई) येथे धोम धरण जलाशयालगत गेल्या एक महिन्यापासून ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटाचे लाईन प्रोडय़ुसर कृष्णानु सार्वभौम उर्फ मॉन्टी (रा. दांडेघर,पाचगणी) यांना ३० मार्च रोजी किसन तुकाराम चिरगुटे (रा. मुगाव) यांनी ३५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यानंतर ३ एप्रिल रोजी पाचगणी येथील हॉटेल रिव्हाईन येथे जाऊन मॉन्टी यांना गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत पुन्हा ३५ लाख रुपयांची मागणी केली. गुरुवारी चिरगुटे व त्यांचे सहकारी पावणेचारच्या सुमारास मुगाव येथील सेटवर जाऊन वीस लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर चित्रपट बंद पाडेन, असे सांगून जोरजोरात आरडाओरडा केला व मारून टाकण्याची धमकी दिली.
याबाबतची फिर्याद मॉन्टी यांनी वाई पोलिसांत रात्री फिर्याद दिल्यावर वाई पोलिसांनी गुन्ह्य़ात वापरलेल्या क्वॉलिस गाडीसह किसन चिरगुटे (रा. मुगाव, ता. वाई), जगन्नाथ पिसाळ (कुडाळ) व अशोक दगडू शिंदे (सातारा) यांना ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे करत आहेत.

Story img Loader