डोंबिवलीत चालकांची मग्रुरी सुरूच
डोंबिवलीतील पोस्ट आणि टेलिग्राफ वसाहतीमध्ये जाण्यास नकार देणाऱ्या एका रिक्षाचालकाने पोलिसांनाही न जुमानण्याची भाषा करीत शनिवारी रात्री पाटकर रस्त्यावरील (कैलास लस्सीसमोर) वाहनतळावर एका महिलेला मारण्याची धमकी दिली.
एमएच-०५-के-२७६२ असा या रिक्षा चालकाच्या रिक्षेचा नंबर आहे. तिलोत्तमा थिटे या महिला कुटुंबीयांसह शनिवारी रात्री दहा वाजता घरी जात होत्या. वाहनतळावर त्यांनी थेट भाडय़ाच्या रिक्षेत बसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी पोस्ट आणि टेलिग्राफ वस्तीत येणार नाही. थिटे यांनी रिक्षा चालकाला आम्ही रिक्षेत बसणारच असे सांगताच चालकाने हेतुपुरस्सर रिक्षा वेगाने पुढे नेली. या झटापटीत थिटे यांच्या पायाला लागले. उद्दाम रिक्षाचालक पुढे जाऊन उभा राहिला. थिटे यांनी रामनगर पोलिसांना दूरध्वनी केल्यानंतर अध्र्या तासाने पोलीस तेथे आले. तोपर्यंत संबंधित रिक्षाचालक पळून गेला होता. थिटे यांनी त्या चालकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
वाहतूक पोलिसांनी प्रवाशांशी उद्धट वर्तन व भाडे नाकारणे अशी तक्रार दाखल करून घेतली आहे. या चालकाकडून बेशिस्त वर्तन केल्याबद्दल अडीच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. याबाबतची तक्रार उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. भाडे का नाकरतोस म्हणून जाब विचारणाऱ्या एका वृद्धेला एका रिक्षाचालकाने नुकतीच बेदम मारहाण केली होती. मग्रुर आणि उद्दाम स्वभावाच्या काही रिक्षाचालकांमुळे सर्व चालक नाहक बदनाम होत आहेत. अशा चालकांवर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना संघटना कोणतेही पाठबळ देणार नाही, असे रिक्षा संघटनेचे सरचिटणीस शेखर जोशी यांनी सांगितले.

Story img Loader