भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात ८१ हजार बूथवर वन बूथ टेन यूथ अभियान राबविले जाणार आहे. ऑगस्टमध्ये सर्व बूथप्रमुखांचा मुंबईत मेळावा घेण्यात येणार आहे. प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी मेळाव्यास मार्गदर्शन करतील. आगामी लोकसभा व राज्यातील विधानसभा निवडणुका खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणार असल्याची माहिती भाजपचे राज्य प्रवक्ते गणेश हाके यांनी दिली.
भाजप कार्यालयात बूथ विस्तार कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत हाके बोलत होते. जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा संघटनमंत्री रेणुकादास देशमुख पिंपरीकर, सरचिटणीस बी. डी. बांगर, तानाजी मुटकुळे आदी उपस्थित होते. हाके यांनी सांगितले की, राज्यात ८१ हजार ६७१ बूथ आहेत. या सर्व बूथवर भाजपाचे प्रतिनिधी पोहोचावेत, या साठी आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका समोर ठेवून त्याजिंकण्याच्या उद्देशानेच वन बूथ टेन यूथ अशी रचना करण्यात आली. बूथ समितीमध्ये ३ युवा, ३ महिला अनिवार्य असून एससी, एसटी, शक्य तेथे अल्पसंख्य समाजाच्या व्यक्तीचा समावेश असेल. दि. २ ऑगस्टनंतर ५६ जिल्हा मंडळांत प्रत्येकी एकाकडे एकेका जिल्ह्य़ाची जबाबदारी सोपविली जाईल. हिंगोली जिल्ह्य़ात ९ हजार ८५६ जण या निमित्ताने संघटित होतील व भाजपाला कार्यकर्त्यांचा संच मिळेल. हेच कार्यकर्ते पक्ष विस्ताराचे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.