राज्याच्या एका भागात भयाण दुष्काळ पडला आहे. अन्न, पाणी, जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पाश्र्वभूमीवर कल्याणमधील सद्गुरू उत्सव समिती आणि कोकण वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तरुण सदस्यांनी घरोघरी जाऊन एक वाटी धान्य जमा करण्याचा उपक्रम राबविला. या माध्यमातून तरुणांनी एक टन धान्य जमा केले असून ते दुष्काळग्रस्त भागात नेऊन वाटण्यात येणार आहे.
या उपक्रमात बिर्ला महाविद्यालय परिसर, गौरीपाडा, कोकण वसाहत, रामदासवाडी, खडकपाडा भागांतील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळांतील कार्यकर्ते एक वाटी धान्य जमा करण्यासाठी पुढे आले आहेत. शहरातील जनतेला दुष्काळाची जाणीव व्हावी, या उद्देशातून हे धान्य जमा करण्यात येत असल्याचे तरुणांनी सांगितले.