कल्याणमधील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यासाठी स्थायी समितीने मंगळवारी ९० लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. डोंबिवलीत काही महत्त्वाचे नाले असूनही या खर्चाचा प्रस्ताव मात्र स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला नाही किंवा या खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नाही. याविषयी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. स्थायी समिती सभापती प्रकाश पेणकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत कल्याणमधील नालेसफाई कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. पालिकेच्या ‘ड’ प्रभागातील नालेसफाईच्या कामाचा ठेका महादेव कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आला. या कामासाठी ३४ लाख २९ हजार खर्च येणार आहे. क प्रभागातील नालेसफाईचे काम मे. ऋषिकेश कन्स्ट्रक्शन यांना २९ लाख ३९ हजार, ब प्रभागातील नालेसफाईसाठी २६ लाख ४५ हजाराची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी हे नाले साफ करण्यात येणार आहेत. डोंबिवलीत काही महत्त्वाचे नाले आहेत. या नाल्यांच्या साफसफाईचा प्रस्ताव स्थायी समितीत प्रशासनाने मंजुरीसाठी न ठेवल्याने काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी डोंबिवलीतील नालेसफाईच्या कामासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हे प्रस्ताव आयुक्तांच्या अखत्यारीत मंजूर करण्यात येतील, असे कार्यकारी अभियंता रवींद्र जौरस यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा