कोल्हापूर जिल्ह्य़ात कृषी विभागाकडून शेती विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. आजरा येथे सुगंधी व औषधी वनस्पतींचा पार्क होण्यासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळातून १ कोटी रुपये देण्यात येणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जनजागृती अभियानाच्या सांगता समारोप प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गृहराज्यमंत्री सतेज पाटील होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, लोकसहभागातून पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम यशस्वी होईल. शेतकऱ्यांनी मालाची स्वत विक्री करणे गरजेचे असून बाजारात विकली जाणारी पिके घेणे काळाची गरज आहे. कोल्डस्टोरेजची वीज दरआकारणी व्यावसायिक दराने न आकारता शेतीच्या दृष्टीने आकारणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सतेज पाटील म्हणाले, ऊस पाचट अभियानाने शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. बांधावर खत देण्याची महत्त्वाकांक्षी योजना शासन राबवित असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख कोल्हापुरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, एक पिकाचा प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले.
जिल्हा कृषी अधीक्षक उमेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सामाजिक वनीकरण विभागाच्या हरित पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. ऊस पाचट अभियान पोस्टरचे प्रकाशन सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. पाणलोट घडीपुस्तिकेचे प्रकाशन प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा