संकेतस्थळावरून ऑनलाइन रिचार्ज करा आणि थ्रीजी सुविधेचा अमर्याद आनंद लुटा.. याशिवाय रिचार्जची मुदत संपल्यानंतरही बाद होणारे पैसे पुढील महिन्यात पुन्हा वापरा.. अशी बतावणी करून नागरिकांना गंडा घालणारी टोळी कार्यरत झाली असून, ही टोळी महाराष्ट्रासह अन्य राज्यांत कार्यरत असल्याची माहिती पुढे येऊ लागली आहे. ठाणे येथील नौपाडा भागात राहणारा रौनक पाटील या तरुणाला या टोळीने अशीच बतावणी करून आपल्या जाळ्यात ओढले आणि त्याच्या खात्यातून ८४ हजार रुपये काढून घेतले. रौनकला बँकेने वस्तूचे तसेच अन्य खरेदीसाठी कर्ज रूपाने सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्याचा फायदाही या भामटय़ांनी घेतला असून त्याच्या नावे सुमारे एक कोटी रुपयांची खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, याविषयी बँकेला माहिती देऊनही हा प्रकार सुरूच राहिल्यामुळे रौनक चक्रावून गेला आहे. या प्रकरणी ठाणे अर्थिक व सायबर गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार दाखल झाली आहे. ठाणे येथील नौपाडा परिसरात राहणारा रौनक पाटील हा संगणक अभियंता आहे. त्याने ७ जुलै रोजी मोबाइलद्वारे ऑनलाइन रिचार्ज केले होते. तरीही रिचार्जची रक्कम खात्यात आलेली नसल्यामुळे त्याने कंपनीकडे पैसे मागितले. त्यानुसार कंपनीने त्याच्या खात्यात रिचार्जचे पैसे जमा केले. त्याच्या या ऑनलाइन व्यवहाराकडे लक्ष ठेवलेल्या भामटय़ांनी त्याला त्याच दिवशी मोबाइलवर दूरध्वनी केला. संकेतस्थळावरून ऑनलाइन रिचार्ज करा आणि थ्रीजी सुविधेचा अमर्याद आनंद लुटा.. याशिवाय रिचार्जची मुदत संपल्यानंतरही बाद होणारे पैसे पुढील महिन्यात वापरा.. अशी माहिती त्याला दूरध्वनीवरून देण्यात आली. त्यासाठी त्यांना स्वतंत्र संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार त्याने मोबाइलवरून १०१ रुपयांचे ऑनलाइन रिचार्ज केले, मात्र हे रिचार्जसुद्धा अयशस्वी ठरले आणि त्यानंतर रौनकला २३ जुलै रोजी पुन्हा एक दूरध्वनी आला. या वेळी अज्ञातांनी त्याचे नाव, बँक खात्याच्या कार्डचा क्रमांक, अशी इत्थंभूत माहिती त्याच्याकडून दूरध्वनीवरून घेतली. त्यानंतर काही क्षणातच त्याच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचा उद्योग सुरू झाला. त्याच्या खात्यातील संपूर्ण ८४ हजार रुपये काढून घेण्यात आले. खात्यातून पैसे काढले जात असल्याचे कळताच रौनकने बँकेला कळवून संबंधित बँक खाते गोठविण्यास सांगितले. तसेच ऑनलाइन खरेदी होत असलेल्या संबंधित संकेतस्थळावर फोन करत त्यांना या प्रकाराची माहिती दिली. या संकेतस्थळावरून रौनकला ३४ हजार रुपयांची रक्कम परत मिळाली. मात्र गोठवलेल्या खात्यातून दुसऱ्या दिवशीही पैसे काढण्याचा व्यवहार भामटे बिनदिक्कत करत होते. अशा प्रकारे सुमारे एक कोटी ३४ हजारांची खरेदी करण्यात आली असून या पैशातून मोबाइल रिचार्ज खरेदी करण्यात आले आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी रौनकने ठाणे सायबर गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा