पाण्याअभावी कोरडय़ा पडलेल्या माजलगाव प्रकल्पातील गाळ काढून भविष्यात पाणीपातळी वाढवण्यासाठी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना लोकसहभागातून गाळ काढण्यासाठी तब्बल एक कोटीचा निधी जमा झाला.
माजलगाव प्रकल्पात सध्या शून्य टक्के पाणीसाठा आहे. मागील २५ वर्षांत प्रथमच हा प्रकल्प आटला आहे. भविष्यात परिसरात पाणीटंचाईने तीव्र संकट ओढवणार आहे. या पाश्र्वभूमीवर सोळंके यांनी तालुक्यातील प्रमुख संस्था व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरडय़ा पडलेल्या तलावातील गाळ काढून शेतीत नेण्याचे आवाहन केले. यासाठी सरकारने रॉयल्टी माफ केले आहे. गाळामुळे जमिनीचा पोतही सुधारेल व तलावातील पाणीसाठाही भविष्यात वाढेल.
सोळंके यांच्या आवाहनाला सर्वपक्षीय व संस्थांनी प्रतिसाद दिला आणि तब्बल एक कोटीचा निधी गाळ काढण्यासाठी जमा करण्यात आला. यात प्रामुख्याने शिक्षकांनी एक दिवसाचे वेतन ११ लाख रुपये, ग्रामसेवक संघटनेचे ३ लाख, तुळजाभवानी मल्टिस्टेट, पंचायत समिती सभापती, उपसभापती यांच्यासह शहरातील विविध पक्षसंघटनांनी आर्थिक मदत जाहीर केली. तहसीलदार महेश शेवाळे, नगराध्यक्ष डॉ. अशोक तिडके यांच्यासह विविध पक्षसंघटनांचे, संस्थांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Story img Loader