एसटीची धडक बसून रविवारी हरळी (ता.गडहिंग्लज) येथे दुचाकीस्वार ठार झाला. या अपघातात समीर महंमद मुजावर (वय ३६, रा.महागाव) याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे महागावातील संतप्त नागरिकांनी घटनास्थळी येऊन अपघातग्रस्त एसटीवर जोरदार दगडफेक करून ती पेटवून दिली. पोलिसांच्या समोर हा प्रकार घडूनही ते कसलाही प्रतिकार करू शकले नाहीत.
समीर मुजावर हे आपल्या दुचाकीवरून महागावहून गडहिंग्लजला निघाले होते. हरळी येथील गडहिंग्लज साखर कारखान्याच्या जवळून ते जात होते. त्याचवेळी समोरच्या बाजूने चंदगड आगाराची एसटी कोल्हापूरहून येत होती. चंदगडकडे चाललेल्या या एसटीची व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की मुजावर हे मागील चाकात सापडले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मुजावर राहत असलेल्या महागावातील नागरिकांना समजली. तेथील नागरिक गटागटाने घटनास्थळी आले.
अपघाताला एसटी कारणीभूत असल्याचे समजून त्यांनी एसटीवर राग काढण्यास सुरुवात केला. एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साहित्यासह खाली उतरविले. जमावाकडून एसटीवर बेधुंद दगडफेक केली जात होती. त्यानंतर जमावाने एसटी पेटवून दिली. पेटलेल्या बसच्या ज्वाळा उंच जात होत्या. यामध्ये एसटी बेचिराख झाली. सुमारे तासाहून अधिक काळ जमाव आपला राग व्यक्त करीत होता. घटनास्थळी गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सूर्यवंशी व सहकारी होते. त्यांनी जमावाला काबूत आणण्यासाठी फारशा हालचाली केल्या नाहीत. उलट त्यांच्यासमोरच जमावाची बस पेटवून देण्यापर्यंत तासाहून अधिक काळ धुडगूस घालण्यापर्यंत मजल गेली होती. अपघात झाल्यानंतर एसटीचालक तुकाराम पुंडलिक मुंडे याने गडहिंग्लज पोलिसांना माहिती दिली. याबाबत गडहिंग्लज पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे. जमावाकडून सुरू असलेली दगडफेक व बस पेटविण्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास बंद होती.

Story img Loader