पाण्यासाठीची लढाई चांगलीच जीवघेणी ठरत असल्याचे चित्र बुधवारी जिल्हय़ात दिसून आले. सायकलवर पाणी आणण्यास जाणाऱ्या वृद्धाचा खासगी स्कूल बसने धडक दिल्याने मृत्यू झाला, तर कारेगाव येथे उसाच्या फडात झोपलेल्या एक वर्षांच्या बालकाला भरधाव मालमोटारीने चिरडले. धारूर घाटात मालमोटार उलटून एकजण जखमी झाला. चौथ्या घटनेत चालकाला अचानक चक्कर आल्याने एस.टी. बस दुकानात घुसली. बसमधील ४० प्रवासी थोडक्यात बचावले. बुधवारी या चार वेगवेगळय़ा घटना घडल्या.
शहरातील नगर रस्त्यावर सकाळी साडेनऊच्या सुमारास गोपीनाथ किसन नागवडे (वय ६०) पाणी आणण्यास सायकलवरून जात होते. खासगी स्कूल बसने (एमएच २३ ७२१०) त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. केज तालुक्यातील कारेगाव येथील कानिफ मनोहर शिंदे हे जाधवजवळा येथे ऊसतोडणीचे काम करतात. बुधवारी सकाळी उसाच्या फडात त्यांचा समीर हा एक वर्षांचा मुलगा झोपला असताना ऊसतोडणीस आलेल्या भरधाव मालमोटारीने (एमएच ०६ के ३४५) मुलाला चिरडले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. धारूर घाटात उसाची मालमोटार चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली गेली. यात एकजण जखमी झाला. चौथ्या घटनेत कळंब आगाराची बस (एमएच १४ डीपी १९४७) केजकडे येत असताना चालकाला अचानक चक्कर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात घुसली. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही व बसमधील ४० प्रवासीही थोडक्यात बचावले.

Story img Loader