* चार आठवडय़ात सातवा बळी   *  ताडोबानजीकची गावे दहशतीत
ताडोबा व्याघ्र प्रकल्पा लगतच्या पायली गावातील कीर्ती काटकर या १२ वर्षीय मुलीवर आज सकाळी बिबटय़ाने हल्ला केल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण असून चंद्रपूर जिल्ह्य़ात गेल्या २५ दिवसात बिबटय़ाने घेतलेला हा सातवा बळी आहे. दरम्यान बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी पिंजरा लाण्यात आला आहे.
 ताडोबा व्याघ्र प्रकल्पा लगत चंद्रपूर वन विभागाचे नियमित जंगल आहे. या जंगलालगत पायली गावातील कीर्ती काटकर ही मुलगी प्रातर्विधीसाठी शेतालगत इरई नदीच्या नाल्यावर गेली होती. झुडपी जंगलाच्या आड बसलेली असताना बिबटय़ाने हल्ला करून तिच्या नरडीचा घोट घेतला. यानंतर बिबटय़ाने मुलीचा मृतदेह तोंडाने काही दूर अंतरावर फरफटत नेला. बराच वेळ झाला तरी ताईआली नाही म्हणून तिची लहान बहीण झाडीच्या दिशेने बघण्यासाठी गेली असता तिला चपला दिसल्या. यानंतर काही दूर अंतरावर बिबटय़ा कीर्तीला फरफटत नेत असल्याचे दिसले. हे दृष्य बघून तिने ओरडण्यास सुरूवात केली. मुलीच्या ओरडण्याच्या आवाजाने वडील धावत आले. यावेळी प्रत्यक्षदर्शी मुलीने वडीलांना या घटनेची माहिती दिली. बिबटय़ाच्या जबडय़ात मुलीला बघून वडिलांनी  त्याच्या दिशेने कुऱ्हाड व बल्ली फेकून मारली. त्यामुळे बिबटय़ा मृतदेह तिथेच सोडून जंगलात पळून गेला. परंतु, मदत मिळेपर्यंत तोवर कीर्तीचा मृत्यू झाला होता.
यानंतर घटनास्थळी गावकऱ्यांची एकच गर्दी उसळली. वन खात्याला या घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक विनय ठाकरे मोठा ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. संतप्त गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांना घेराव करून बिबटय़ाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी
केली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी एक पिंजरा लावण्यात आला. यानंतर मृतदेह पंचनामा व शवविच्छेदन करून कुटूंबियांकडे सोपविण्यात आला. वन खात्याने दहा हजाराची तात्काळ मदत दिली. तसेच पाच लाखाची भरपाई तातडीने देण्याचे आश्वासन उपवनसंरक्षक विनय ठाकरे यांनी दिले.
विधानसभेत दखल
 गेल्या २५ दिवसांच्या कालावधीत चंद्रपूर जिल्हय़ात वाघ व बिबटय़ांच्या हल्ल्यात सात नागरिकांचे बळी गेले असून वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे आणखी किती नागरिकांचे बळी देणार आहोत, असा संतप्त सवाल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केला. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने तातडीने निवेदन करावे असे निर्देश विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. पायली येथे झालेल्या बिबटय़ाच्या हल्ल्यात कीर्ती काटकर या मुलीच्या झालेल्या मृत्यूचा संदर्भ देत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. वनविभागातर्फे कागदोपत्री उपाययोजना केल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात या उपाययोजना केल्या जात नाहीत. हल्ल्यातील जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी आर्थिक मदत वाढविण्याची आवश्यकता आहे, याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.