निरपराध तरुण महिनाभर तुरुंगात खितपत
स्वत:चे प्रेमप्रकरण लपविण्यासाठी एका तरुणीने बलात्काराची खोटी फिर्याद दिल्यामुळे एक निरपराध तरुण गेल्या एक महिन्यापासून तुरुंगात खितपत पडला आहे. विशेष म्हणजे तरुणीला हा बनाव रचण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या तिच्या प्रियकराला न्यायालयाने जामीन मंजूर केला, पण या गुन्ह्य़ात ‘त्या’ तरुणाचा सहभाग नसल्याचा अहवाल हवेली पोलिसांनी सादर केल्यानंतरही त्याची सुटका होऊ शकली नाही.
मल्लप्पा सायबण्णा होमसनी (वय २१, रा. आंबेगाव बुद्रुक) असे निरापराध तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध संबंधित तरुणीच्या भावाने फिर्याद दिली होती. ही तरुणी काही दिवस बेपत्ता होती. काही काळानंतर ती पोलिसांना यवतमाळ येथे सापडली. त्या वेळी तिने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे पोलिसांना सांगितले होते. मल्लप्पा याने बलात्कार केल्याचेही म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी मल्लप्पाला २५ डिसेंबर रोजी अटक केले व न्यायालयाकडून त्याच्यासाठी दहा दिवस पोलीस कोठडी मिळवली. ‘मल्लपाने १७ डिसेंबर रोजी आपले अपहरण केले आणि जबरदस्तीने मोटारीतून चंदनगर येथे नेले. या ठिकाणी चौघांनी आपल्यावर बलात्कार केला. २३ डिसेंबर रोजी वाशीमला नेले. तेथून तीन व्यक्तींनी बलात्कार करून यवतमाळ घाटाजवळ सोडून दिले,’ असा जाब या तरुणीने दिला होता.
या प्रकरणात पोलीस मल्लाप्पाकडे तपास करत असताना असे उघडकीस आले की तरुणी बेपत्ता असल्याच्या काळात मल्लप्पा कर्नाटक येथे होता. पोलिसांनी तरुणीकडे सखोल तपास केला असता वेगळीच माहिती बाहेर आली. तिचे ओमप्रकाश बन्सिलाल पुरोहित (रा. चंदननगर) या तरुणाबरोबर गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसबंध आहेत. त्याला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचे ठरविले. त्यानुसार ती ओमप्रकाशच्या चंदननगर येथील घरी गेली. मात्र, परत आल्यानंतर काय सांगावे म्हणून तिने मल्लाप्पाने आपले अपहरण केले, असा बनाव रचला. ही माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिसांनी ओमप्रकाश याला अटक करून न्यायालयात हजर केले आणि मल्लप्पा याचा या गुन्ह्य़ात काही संबंध नसल्याचा फौजदारी दंड संहिता १६९ नुसार अहवाल दिला. मात्र, या प्रकरणात मल्लाप्पाचा काही संबंध नसताना त्याला अद्यापही जामीन मिळालेला नाही. मात्र, ओमप्रकाश याला जामीन दिला आहे. मल्लाप्पाला जामीन मिळावा म्हणून त्याचे वकील अ‍ॅड. अभय शिरसाट
यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. यू. जोशी यांनी तपास अधिकारी व मूळ फिर्यादीला न्यायालयात हजर राहण्याची नोटीस
बजावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One girl says lie that rape on her for hideing the love affair