देऊळगावराजातील संतोष चौकातील बॅंक ऑफ महाराष्ट्रवर बुधवारी रात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास चोरटय़ांनी दरोडा टाकण्याच्या प्रयत्न केला, पण  अचानक भोंगा वाजल्यामुळे व पोलिसांच्या सर्तकतेमुळे बॅंकेवरील या दरोडय़ाचा प्रयत्न फसला.
देऊळगावराजा शहरातील मेन रोडवर बॅंक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. बुधवारी रात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी बॅंकेच्या वरील मजल्याच्या लाकडी दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर या चोरटय़ांनी आपला मोर्चा रोकड कक्षाकडे वळविला. चोरटय़ांनी या कक्षाचे लोखंडी गेट तोडण्याचा प्रयत्न करताच तेवढय़ात बॅंकेचा भोंगा वाजला. हा आवाज येताच संतोष चौकात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी बॅंकेकडे धाव घेतली, परंतु तोपर्यंत चोरटे घटनास्थळावरून पसार झालेले होते.