मुस्लिम समाजातील गरीब कुटुंबासाठी सौदी अरबमधून आर्थिक मदत आली आहे, असे आमिष देऊन एका भामटय़ाने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकास दहा हजार रुपयांनी फसविले. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात भामटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मेहकर तालुक्यातील उटीच्या शेख मुसा शेख अहेमद यांनी अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्यासाठी पत्नी दुल्हनबीला ४ फेब्रुवारीला शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी रुग्ण महिलेसोबत तिची आई खातुनबीही होती.
दुपारी बारा वाजताच्या सुमारास एका भामटय़ाने वॉर्डात जाऊन सौदी अरबमधून मुस्लिम समाजातील गरीब कुटुंबासाठी आर्थिक मदत आली आहे. ही मदत तहसील कार्यालयातून देण्यात येते, असे आमिष देऊन शेख मुसा व त्यांची सासू खातूनबी यांना तहसील कार्यालयात आणले.
यावेळी त्याने तुम्ही गरीब दिसले पाहिजे म्हणून खातूनबी यांच्या हातातील चांदीच्या पाटल्या काढून शेख मुसा याच्याकडे दिल्या. त्यानंतर तुमच्या सासूचे काम झाले, असे म्हणून शेख मुसा यांच्याकडील चांदीच्या पाटल्या  आणिा चार हजार रुपये काढून घेतले. काही वेळातच मदत देणारे लोक येतील. तुम्ही येथेच थांबा, असे म्हणून भामटय़ाने थेट शासकीय रुग्णालय गाठले. यावेळी त्याने वॉर्डात भरती असलेल्या दुल्हनबीच्या गळ्यातील सोन्याची पोत घेऊन पोबारा केला.
एक-दीड तास झाला तरी मदत करणारे इसम आले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेख मुसा यांच्या लक्षात आले. त्यांनी तडक शहर पोलीस ठाणे गाठून भामटय़ाविरुध्द तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे, अनुचित घटना घडू नये म्हणून शासकीय रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, परंतु एक वाजेपर्यंत ते बंद होते. कॅमेरे सुरू असते तर निश्चितच गरीब कुटुंबाची फसवणूक करणाऱ्या भामटय़ाचा शोध लागला असता.

Story img Loader