स्कोडा गाडीतून आलेल्या चारजणांनी येथील बसस्थानकात दोघा सोनारांवर हल्ला करीत गोळीबार करुन त्यांच्याजवळील दागिने लुटण्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी चार फैरी झाडत सोनारांकडील लाखोंचे दागिने लंपास करत पोबारा केला. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीला गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला.
संगमनेर बसस्थानकात पहाटे साडेसहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहरातील सोनार व संगमनेरकर हादरले आहेत. घटनास्थळी पोहोचण्यास पोलिसांनी अर्धा तास लावल्याने हल्लेखोर दागिने घेऊन पसार होण्यास मदत झाली. मुंबई-संगमनेर या एशियाडमधून अंकित मनोज जोशी व विक्रम बाबूलाल बोरा हे दोघे मावसभाऊ संगमनेरला आले. संगमनेरातील सोनारांना दागिने बनवून देण्याचा त्यांचा व्यवसाय असून येथील सोनारांना दागिने देण्यासाठी ते आले होते.
त्यांच्या पाळतीवर आधीपासूनच असलेली एक स्कोडा गाडी त्यांच्यापासून काही अंतरावरच उभी होती. दोघा सोनारांपैकी विक्रम हा लघुशंकेसाठी जात असताना त्याच्यापाठीमागे स्कोडातील चौघांपैकी एकजण गेला, तर अंकित सोन्याचे दागिने असलेल्या बॅगा घेऊन एका कोपऱ्यात उभा होता. त्याच्याजवळ दोघेजण आले व त्यांनी त्याच्याकडील दागिन्यांची बॅग मागितली. अंकित दागिने देत नसल्याने त्यांच्यात झटापट झाली व एकाने आपल्याजवळील पिस्तूल अंकितच्या कानाला लावत हवेत दोन व जमिनीवर दोन फैरी झाडल्या. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात बसस्थानकावर मुलीला सोडण्यासाठी आलेल्या पित्याच्या गालाजवळून गोळी चाटून गेल्याने ते किरकोळ जखमी झाले.
गोळीबारामुळे घाबरलेल्या अंकितच्या हातातून लाखो रुपये किमतीच्या दागिन्याच्या बॅगा घेऊन हल्लेखोरांनी स्कोडातून पलायन केले. दरम्यान, तेथे असलेल्या एका रिक्षाचालकाने हल्लेखोरांच्या गाडीचा नंबर टिपून घेतला. एमएच ०४-सीएम ७२४० असा हा क्रमांक असून पोलीस त्या स्कोडाच्या शोधात आहेत. घटनास्थळी उशिराने पोहोचलेल्या पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना तेथे दोन पुंगळ्या आढळून आल्या आहे. आरोपींच्या शोधासाठी नगर, नाशिक, पुणे येथेही नाकाबंदी केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पगार यांनी दिली. जखमी व्यक्तिबाबत काहीही माहिती उपलब्ध होत नसल्याचे सांगत त्याबाबतही तपास सुरु असल्याचे ते म्हणाले. तसेच हल्लेखोरांनी दोघा सोनारांच्या ताब्यातील सुमारे तीस लाख रुपये किमतीचे एक किलो सोने नेल्याचे सांगितले. पोलीस आरोपींचा शोध घेत असून ऐन दिवाळी सणाच्या काळात घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.    

Story img Loader