कोठारी वनपरिक्षेत्रातील चेकबरडीच्या जंगलात बांबू तोडण्यासाठी गेलेल्या मोहनसिंग ठाकूर (४५) याच्यावर वाघाने हल्ला केला असता त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गणेश नानाजी मंदाडे (३५) हा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर मृतदेहावर दोन पट्टेदार वाघांनी मिळून ताव मारल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. जखमी मांदाडे याला गोंडपिंपरीच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर चेकबरडीत तणावाचे वातावरण असून दोन्ही वाघांना जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली आहे.
गोंडपिंपरी या तालुक्याच्या ठिकाणाजवळच आक्सापूरलगतच्या चेकबरडी येथील मोहनसिंग ठाकूर व त्याचे तीन मित्र असे चौघे जण आज पहाटे चार वाजता वनविकास महामंडळाच्या कोठारी वनपरिक्षेत्रात कक्ष क्रमांक १२० मध्ये चेकबरडीच्या जंगलात बांबू तोडण्यासाठी गेले होते. यानंतर पहाटे सहाच्या सुमारास गावाकडे परततांना पट्टेदार वाघाने मागावून मोहनसिंग ठाकूर यांच्यावर झडप घातली.
यात वाघाने ठाकूर यांच्या चेहऱ्यावर पंजा मारून त्यांना घटनास्थळीच ठार केले, तर गणेश मांदाडे या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. या हल्ल्याने ठाकूर यांच्यासोबतचे तिन्ही मित्र पसार झाले आणि बचावासाठी झाडावर चढून बसले. माणसाची शिकार केल्यानंतर पट्टेदार वाघ तिच्यावर ताव मारत असतांना झुडपातून दुसरा पट्टेदार वाघ आला. हे दोघे मिळून शिकारीवर ताव मारत होते, तर हा सर्व थरार झाडावर बसलेले तिन्ही मित्र उघडय़ा डोळय़ांनी बघत होते. एक ते दीड तासांनी वाघ घटनास्थळाहून थोडे दूर जात नाही तोच तिन्ही मित्र झाडावरून खाली उतरून गावात परतले. त्यांनी या घटनेची माहिती वन विभाग, तसेच गावकऱ्यांना दिली. माहिती मिळताच गावकरी व वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पुलगमवार, कोठारीचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एम.उके व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला, तर जखमी गणेश मांदाडेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले.
मृत ठाकूर यांच्या कुटुंबीयांना २५ हजाराची तातडीची आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी उके यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. या घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कुरेशी यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी सर्व गावकऱ्यांनी या दोन्ही वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात पट्टेदार वाघ व बिबटय़ाने धुमाकूळ घातला आहे. येथील गावकऱ्यांचा बचाव करायचा असेल तर वाघाचा पहिले बंदोबस्त करा, अशी मागणी सर्वानी लावून धरली आहे. सध्यातरी गावात भीतीचे वातावरण असून वन विभाग दोन वाघांचा शोध घेत आहेत.