डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिकाऱ्यांतर्फे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी आपत्कालीन विद्यार्थी सहायता निधी अंतर्गत एक लाख रुपयांची रक्कम बुधवारी दिवसभरात जमा झाली.
मराठवाडय़ात सध्या दुष्काळी स्थिती असून बाहेरगावाहून विद्यापीठात शिकण्यास, तसेच वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आपत्कालीन विद्यार्थी सहायता निधी जमा केला. कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे व कुलसचिव डॉ. डी. आर. माने यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला. ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. एम. एस शिनगारे, वित्त व लेखाधिकारी डॉ. एस. टी. सांगळे, डॉ. नंदकुमार नाईक यांची उपस्थिती होती. दुष्काळापुरताच हा निधी मर्यादित नसून, आगामी काळात विद्यार्थ्यांच्या हितासाठी निधी जमा केला जाईल, असे डॉ. पांढरीपांडे यांनी सांगितले.