देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे दोन वर्षांपूर्वी गोळीबारातून झालेल्या दुहेरी खुनातील एका तरुणास जन्मठेपेची, तर आणखी तीनजणांना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली. खटल्यातील इतर आठ आरोपींची मुक्तता करण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश राजेंद्र वानखडे यांनी या खटल्याचा निकाल आज दिला. सरकारतर्फे सरकारी वकील रामदास गवळी यांनी काम पाहिले.
खुनाच्या आरोपावरुन आबासाहेब बाळासाहेब वरखडे (२२, देवळाली प्रवरा) यास जन्मठेपेची व ५ हजार रुपये दंडाची, पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरुन ७ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रु. दंडाची शिक्षा सुनाण्यात आली. दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. सुनील शिवाजी वरखडे (२२ देवळाली प्रवरा), पप्पू धोंडिराम बोरसे (२६) व लखन सुभाष साळुंके (२०, राहुरी फॅकटरी) या तिघांना पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरुन ७ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ३ हजार रु. दंडाची शिक्षा करण्यात आली. ब्रम्हानंद विठ्ठल कोरबणे, नारायण साहेबराव धाडगे, गोरक्षनाथ केशव धाडगे, नितीन अशोक शेजवळ, दिनेश जगन्नाथ आरणे, बाळासाहेब रंगनाथ वरखडे, किशोर भाऊसाहेब लोखंडे व इक्बाल मुसा शेख या आठजणांची आरोपातून मुक्तता करण्यात आली. घटनेत संपत बाळकृष्ण मुसमोडे व दत्तात्रेय भगवान येवले या दोघांचा पिस्तूलातून गोळ्या घालून खून करण्यात आला होता.
सन २०१० मध्ये देवळाली प्रवराच्या ग्रामस्थांनी गावच्या शिवारातील उसाचे वाढे गावीतालच शेतकऱ्यांना विकायचे दुसऱ्या गावात विक्रीसाठी घेऊन जायचे नाही, असा निर्णय घेतला होता. ८ मार्च २०१०च्या रात्री ८.३०च्या सुमारास उसाचे वाढे किशोर लोखंडे यांच्या टेम्पोत भरुन आबासाहेब वरखडे, सुनिल वरखडे, बाळासाहेब वरखडे, प्रसाद ऊर्फ पप्पू बोरसे, लखन साळुंके व लोखंडे हे दुसऱ्या गावात घेऊन जात असताना तो गावकऱ्यांनी अडवला. त्यातून दोन्ही गटात भांडणे झाली. ती लगेच त्या ठिकाणी मिटलीही.
परंतु मयत मुसमोडे याचा भाऊ संपत व मयत दत्तात्रेय येवले हे दोघे वरखडे यांना समजावून सांगण्यासाठी त्यांच्या वस्तीवर गेले असताना आबासाहेब वरखडे याने इतर आरोपींशी संगनमत करुन देवळाली प्रवरा ते राहुरी फॅक्टरी या रस्त्यावर, मुळा डावा कालवा चारीजवळील चोथेवस्ती येथे दि. २ फेब्रुवारीच्या रात्री सव्वा दहा ते सव्वा अकराच्या सुमारास स्वत:च्या पिस्तुलातून दोघांना गोळ्या घालून ठार केले व दोघांचे मृतदेह कालव्यात टाकून पुरावा नष्ट केला. यासंदर्भात मयत संपत याचा भाऊ अशोक मुसमाडे याने राहुरी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक बागवान यांनी तपास केला व आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.    
  ३३ पैकी फिर्यादीसह १४ साक्षीदार फितूर
खटल्यात एकूण ३३ साक्षीदार सरकारी वकील गवळी यांनी तपासले. त्यातील तब्बल १४ साक्षीदार फितूर झाल्याचे सरकारी वकिलांनी जाहीर केले. फितूर झालेल्यामध्ये फिर्यादी अशोक मुसमोडे याचाही समावेश आहे. तो गोळीबारात ठार झालेला संपतचा भाऊ आहे. परंतु प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राजुळे, पोलीस निरीक्षक बागवान व वैद्यकीय अधिकारी डॉ. हुसेनी यांची साक्ष ग्राह्य़ मानण्यात आली.

Story img Loader