येथील रत्नाप्पाण्णा कुंभार नागरी पतसंस्थेतील अवजड स्वरूपाची सेफ कॅश तिजोरी शनिवारी पहाटे चोरटय़ांनी ९९ हजार ४१४ रूपयांवर डल्ला मारला. तर, बाजूलाच असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरने कट करून चोरीचा प्रयत्नही केला. चेहऱ्यावर बुरखा परिधान करून आलेल्या सुमारे सात ते आठ चोरटय़ांनी ही चोरी केल्याचे सीसी टीव्हीमध्ये दिसून आले आहे. याबाबत करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
आर.के.नगरमध्ये रत्नाप्पाण्णा कुंभार नागरी पतसंस्था आहे. या पतसंस्थेमार्फत ग्राहकांना सेफ कॅशची सेवा उपलब्ध दिली जाते. पतसंस्थेमध्ये असलेली लोखंडी सेफ कॅश तिजोरी अवजड होती. ती चार ते पाच लोकांना उचलता येणे कठीण असल्याचे सांगितले जाते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरटय़ांनी पतसंस्थेचे शटर व ग्रीलची कुलपे गॅस कटरच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश मिळविला. तेथे असलेली सेफ कॅश तिजोरीच त्यांनी चोरून नेली. त्यामध्ये ९९ हजार ४१४ रूपये होते, असे पतसंस्थेचे सचिव अनिल शिरगावे (रा.आर.के.नगर, मोरेवाडी, ता.करवीर) यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे.     
पतसंस्थेत डल्ला मारल्यानंतर चोरटय़ांनी शेजारीच असलेल्या स्टेट बँकेकडे मोर्चा वळविला. तेथेअसलेले एटीएम मशीन गॅस कटरने कट करून त्यामधील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटय़ांच्या हाती पैसे लागले नाहीत. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार, करवीरचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल लाड, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा