गेल्या दोन वर्षांत राज्य पातळीवर राबविण्यात आलेल्या महालोक अदालतीत सर्वाधिक दावे निकाली काढणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ाने यंदा प्रथमच देशपातळीवरील राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल एक लाख आठ हजार दावे निकाली काढून राज्यात पुन्हा प्रथम क्रमांक मिळवून हॅट्ट्रिक साधली. शिवाय एकाच दिवशी एवढय़ा संख्येने दावे निकाली काढण्याचा विक्रमही नोंदविला.  
 गेल्या शनिवारी देशभरात सर्वत्र राष्ट्रीय लोक अदालत कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयापासून तालुका पातळीवरील न्यायालयांमधील एकूण ३९ लाख दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. फौजदारी, दिवाणी, कामगार, सहकार, बँक, मोटार अपघात आदी स्वरूपाच्या खटल्यांचा त्यात समावेश होता. महाराष्ट्रातून पाच लाख तर ठाणे जिल्ह्य़ातून सव्वा लाख दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांत ही अदालत भरविण्यात आली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश के. के. सोनावणे, जिल्हा प्राधिकरणाचे सचिव सतीश चंदगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अदालतीचा हा कार्यक्रम राबविण्यात आल्याची माहिती प्राधिकरण सदस्य अ‍ॅड. कोजेवाड त्रिंबक यांनी दिली.

Story img Loader