कारवाई न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कामठी पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकाला भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी अटक केली.
मंगेश अंधारे हे अटक केलेल्या आरोपी उपनिरीक्षकाचे नाव आहे. कामठीत राहणारा अवान इस्माईल हा २४ ऑक्टोबरला मध्यरात्री कामठी पोलीस ठाण्यासमोरून मोटारसायकलने जात होता. पोलीस ठाण्यासमोर उभे असलेल्या उपनिरीक्षक मंगेश अंधारे यांना शंका आल्याने त्याने अवानला थांबविले. वाहनाच्या कागदपत्रांसबंधी विचारले असता ही गाडी अवानने सलीम नावाच्या भंगारवालकडून चार हजार रुपयात विकत घेतल्याचे सांगितले. ही गाडी पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवून घेत पुढील कारवाई न करण्यासाठी अंधारे याने ५० हजार रुपयांची मागणी केली. अवानने २० नोव्हेंबरला भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याचे कार्यालय गाठून पोलीस अधीक्षक निशीथ मिश्र यांची भेट घेऊन तक्रार केली.
भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या दरम्यान, अंधारे याने अवानला ५० हजार ऐवजी तीस हजार रुपयांची मागणी केली. मात्र, त्याने ही रक्कम स्वीकारलीच नाही. पोलीस ठाण्यात मोटारसायकलसंबंधी कुठलीही नोंद केलेली नव्हती. भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज सकाळी आरोपी मंगेश अंधारे याला अटक केली. उपअधीक्षक हरिश्चंद्र रेड्डीवार, पोलीस निरीक्षक अशोक देवतळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. लाच मागितल्याप्रकरणी उपनिरीक्षकाला झालेली अटक हा ग्रामीण पोलीस दलात चर्चेचा विषय ठरला.    

Story img Loader