डेंगीसदृश आजाराने अखेर शहरातील एकाचा बळी आज घेतला. राहूल देवराम ठोकळ (वय २५) असे या युवकाचे नाव असून तो महापौर शीला शिंदे यांच्या प्रभागातील रहिवासी आहे. माजी महापौर संग्राम जगताप यांनी या मृत्यूबद्दल मनपा प्रशासन व पदाधिकारी यांना जबाबदार धरून आरोग्य विभागात सुधारणा झाली नाही तर त्यांना रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा दिला.
राहूल ठोकळ हे तापाच्या आजाराने शहरातील गॅलक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल सोमवारी मिळणार आहे. त्यानंतरच त्यांचे निधन डेंगीच्या आजाराने झाले किंवा कसे ते निश्चित होईल, असे मनपाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. गॅलक्सी रुग्णालयाकडूनही नक्की निधन कशाने झाले याबाबत स्पष्टपणे काही सांगितले जात नसल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.
दरम्यान, ठोकळ यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर माजी महापौर संग्राम जगताप यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह लगेचच मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात जाऊन तिथे ठिय्या दिला. नगरसेवक संजय चोपटा, बाळासाहेब बोराटे हेही तिथे आले. त्यांची चौकशी सुरू असतानाच महापौर शीला शिंदे, आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे हजर झाले. त्यावेळी झालेल्या चर्चेत जगताप यांनी प्रशासन व पदाधिकाऱ्यांवर जोरदार टिका केली. ठोकळ हे गरीब कुटुंबातील असल्याने त्यांच्या निधनाने त्यांचे कुटुंब निराधार झाले आहे, त्यांना मनपाने मदत करावी, अशी मागणी जगताप यांनी महापौर व आयुक्तांकडे केली.
ठोकळ यांच्या कुटुंबीयांकडून मनपाकडे वारंवार त्यांच्या परिसरात डास मारणारी औषधी, धूरफवारणी करण्याची मागणी केली जात होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, त्याचे काहीही नियोजन पदाधिकाऱ्यांनी केले नाही व प्रशासनालाही त्याची गरज वाटली नाही, असे जगताप
यांनी महापौर व आयुक्तांना सांगितले. रमेश जोशी, विकी थोरात,
योगेश थोरात, पंकज शिंदे, किरण चंदनशीव आदी यावेळी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा