*  हल्ल्यातील आठवा बळी
*  गावकरी संतप्त, जंगल पेटवले
*  पाईपमध्ये जेरबंद केलेला बिबट पसार
*  वन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाण
*  वनाधिकारीही तणावात, गावे भयभीत
ताडोबालगत बिबटय़ा व वाघाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून आज सलग दुसऱ्या दिवशी बिबटय़ाने किटाळी-इरई धरण मार्गावर गोपिका काळसर्पे (५०) या महिलेवर हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला. यावेळी पाचशे गावकऱ्यांनी बिबटय़ाला पाईपमध्ये जेरबंद केले, मात्र वनाधिकारी उशिरा पोहोचल्याने बिबट जंगलात पसार झाला. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी वन कर्मचाऱ्याला मारहाण करून जंगलाला आग लावल्याने तणाव निर्माण झाला आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत बफर झोन व परिसरातील जंगलात पट्टेदार वाघ व बिबटय़ाने अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे. काल बुधवारी किर्ती काटकर या शाळकरी मुलीचा बिबटय़ाने बळी घेतल्यानंतर चोवीस तास होत नाही तोच आज सकाळी किटाळी गावातील गोपिका काळसर्पे ही महिला इरई धरणाच्या रस्त्याने शेतावर जात असतांना बिबटय़ाने तिच्यावर हल्ला केला. बिबटय़ाने महिलेच्या नरडीचा घोट घेतला असतांनाच वन कर्मचारी व गावकरी तिला सोडविण्यासाठी बिबटय़ाच्या दिशेने धावले. लोकांना अंगावर येतांना बघून बिबटय़ा जंगलात पसार झाला. गोपिकाबाईला गंभीर जखमी अवस्थेत वन कर्मचारी व गावकऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.
गोपिकाबाईच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात व घटनास्थळावर गोंधळ घातला. बिबटय़ाचा बंदोबस्त करा अन्यथा, त्याला ठार करू, असा इशाराच गावकऱ्यांनी दिला. या घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक विनयकुमार ठाकरे ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गावकऱ्यांनी ठाकरे यांना घेराव करून वनकर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. याच संतापात गावकऱ्यांनी एका वन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.
गावकऱ्यांचा संताप बघून वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस व वन कर्मचाऱ्यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटविल्यानंतर गावकऱ्यांनी पुन्हा बिबटय़ाच्या बंदोबस्ताची मागणी लावून धरली. गावकऱ्यांचा संताप लक्षात घेता घटनास्थळी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी सर्च अभियान राबविण्यात येत असतांनाच एका सिमेंट पाईपमध्ये गावकऱ्यांना बिबट लपून असलेला दिसला. यावेळी पाचशे गावकऱ्यांनी बिबटय़ाला त्या पाईपमध्ये जवळपास एक तास घेरून ठेवले. यावेळी गावकऱ्यांनी बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वनाधिकाऱ्यांना बोलावले, मात्र अधिकारी उशिरा आल्याने बिबट अतिशय चपळतेने लोकांचा घेराव तोडून जंगलात पळून गेला. यामुळे गावकरी आणखीच संतापले व जंगलाला आग लावून दिली.
लोकांनी जंगल जाळल्याचे बघून उपवनसंरक्षक ठाकरे यांनी वन कर्मचाऱ्यांचा ताफाच घटनास्थळी बोलावून घेतला. यानंतर एकीकडे जंगल विझवण्याचे व दुसरीकडे गावकऱ्यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याच वेळी वनखात्याच्या एका पथकाने रुग्णालयात येऊन मृत महिलेचा पंचनामा व शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबीयांना दहा हजाराची तातडीची मदत दिली.
बिबटय़ाने सलग दोन दिवसात दोन बळी घेतल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. बिबटय़ा जेरबंद होत नाही तोवर परिसरातील लोकांनी जंगलात मोहफुल वेचण्यासाठी, तसेच काडय़ा आणण्यासाठी जाऊ नये. शेतकऱ्यांना शेतीवर जायचे असेल तर त्यांनी सुध्दा अतिशय सावधगिरीने शेतीवर जाण्याचे आवाहन वनखात्याने केले आहे. २६ दिवसात ८ लोकांचे बळी घेतल्याने गावकरी वनखात्यावर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. त्याचा परिणाम वनाधिकारी तणावात आहेत. अशा परिस्थितीत आम्ही काम कसे करायचे, असा प्रश्न एका वनाधिकाऱ्याने उपस्थित केला.
सध्याची तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता बिबटय़ाला तातडीने जेरबंद करून लोकांमधील दहशत व भीतीपूर्ण वातावरण दूर करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे. यासंदर्भात ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader