दिल्ली बलात्कार घटनेचा जगभरात निषेध होत असताना नांदेडच्या जयभीमनगर परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली. आरोपींमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.
सध्या देशभरात दिल्लीतील बलात्काराच्या घटनेची चर्चा सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ नांदेडात मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. मात्र, हा निषेध सुरू असताना शाळकरी मुलीवर बलात्काराचा प्रकार घडला. जयभीमनगर परिसरात राहणाऱ्या आनंदा घुले (वय २१) याने गुरुवारी याच परिसरात इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीला आपल्या घरी बोलावले व बलात्कार केला. कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर ती मुलगी घरी गेली. मुलीच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची तयारी केली, पण त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. रविवारी मुलीच्या नातेवाइकांनी पोलीस ठाणे गाठले व घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून जबाबदारी झटकली. विनयभंग प्रकरणात आनंदा घुलेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक गेले होते. या प्रकरणाची माहिती समजल्यानंतर याच भागातल्या काही तरुणांनी पुढाकार घेऊन सत्य उघडकीस आणले. काँग्रेसचा एक पदाधिकारी व मुख्य आरोपी घुले याचा नातेवाईक प्रवीण घुले याने हे प्रकरण दाबण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर आनंदला फरारी होण्यातही मदत केली. सोमवारी सकाळी जयभीमनगर परिसरातील तरूण, महिला तसेच नागरिक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जमले. त्यांनी आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक  देशमुख यांनी आनंदा घुले याच्यासह त्याला मदत करणाऱ्या प्रवीण घुले यालाही अटक केली. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader