शहर बस सेवेच्या दरातील वाढीच्या प्रस्तावाबरोबरच महापालिकेच्या स्थायी समितीने आज बाळासाहेब देशपांडे दवाखाना, पाणी पुरवठा विभाग, तसेच अन्य काही आस्थापनांवरील करार पद्धतीने करायच्या नियुक्तयांना मान्यता दिली. बस सेवेच्या सध्याच्या दरात १ रूपयाने वाढ होणार असून ती लगेचच अंमलात येईल. स्मार्ट कार्ड व अन्य योजना आहे तशाच राहणार आहेत.
समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांनी ही माहिती दिली. शहर बस सेवेच्या दरात अलीकडेच झालेली ही दुसरी दरवाढ आहे. डिझेलचे, तसेच सुटय़ा भागांचे दर सतत वाढत असल्यामुळे शहर बस सेवेच्या ठेकेदार कंपनीला त्या दराशी जुळते घेत आपले दर ठेवावे लागतात. त्यामुळे दरवाढीचा प्रस्ताव येत आहे व त्यात अयोग्य काही नाही, असे वाकळे यांनी सांगितले. मात्र, त्यांचा दरवाढीचा प्रस्ताव मंजूर करतानाच त्यांना गाडय़ांच्या संख्येत वाढ करण्याची अट टाकण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
त्यांना काम देताना शहरात टप्प्याटप्प्याने गाडय़ांची संख्या वाढवण्यास सांगितले होते. सध्या त्यांच्या २१ गाडय़ा सुरू आहेत. या सेवेची शहरात गरज असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच त्यांनी गाडय़ा वाढवण्याची गरज आहे, पण ते त्याकडे दुर्लक्ष करत होते. यापूर्वीच त्यांना गाडयांची संख्या वाढवण्याबाबत कळवण्यात आले होते. आता दरवाढीचा प्रस्ताव आल्यामुळे त्याचा आधार घेत त्यांना १ जानेवारीपर्यत गाडय़ांची संख्या ३० करण्याची अट घालण्यात आली आहे, अशी माहिती वाकळे यांनी दिली. तसे त्यांच्याकडून लेखी स्वरूपात घेण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
याचबरोबर देशपांडे दवाखाना, पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग याठिकाणी काही पदांवर करार पद्धतीने नियुक्तया करायच्या होत्या. मनपाच्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राबाबतचे काही प्रस्ताव होते. त्या सर्वाना समितीने मंजुरी दिली, असे वाकळे म्हणाले. समितीचे सर्व सदस्य, तसेच अधिकाऱ्यांसमवेत सर्व विभागप्रमुख सभेला उपस्थित होते, अशी माहिती त्यांनी दिली.

Story img Loader