लढाऊ विमानांचा प्रचंड वेग पाहून त्यावर स्वार होण्याची इच्छा अनेकांना वाटत असली तरी प्रत्येकाची ती इच्छा पूर्ण होईलच, याची शाश्वती नसते. कारण लढाऊ विमान चालवायचे म्हटले, तर प्रथम भारतीय हवाई दलात दाखल होणे अपरिहार्य. त्याकरिता राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा अन् खडतर प्रशिक्षण, असे अग्निदिव्य पार करावे लागते. ती क्षमता सर्वामध्येच असेल असे नाही. त्यासाठी एका विशिष्ट ध्येयाने कार्यरत राहण्याची आवश्यकता असून नाशिकच्या तन्मय राजन मालपुरे या अठरा वर्षीय विद्यार्थ्यांने ते ध्येय जोपासले. त्यामुळेच लहानपणापासून लढाऊ विमान चालविण्याची प्रबळ मनीषा बाळगणाऱ्या तन्मयने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) निवड प्रक्रियेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावत स्वप्नपूर्तीच्या दिशेने भक्कमपणे पाऊल टाकले आहे. हवाई दलाच्या गटात अशी निवड होणारा तन्मय उत्तर महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी असावा.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेस देशभरातून सुमारे साडेतीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते. त्यानंतर ‘एसएसबी’ (सव्र्हिसेस सिलेक्शन बोर्ड) मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवडीच्या गुणवत्ता यादीत केवळ ५०६ जण झळकले. त्यात तन्मयने १४३ वा क्रमांक मिळवीत नाशिकचे नाव ठळकपणे अधोरेखित केले. बारावीची परीक्षा देतानाच अगदी सहजपणे या परीक्षेचा केलेला अभ्यास आणि आई-वडिलांकडून मिळालेले पाठबळ, या बळावर हे यश दृष्टिपथास आल्याची प्रतिक्रिया तन्मयने ‘नाशिक वृत्तान्त’कडे दिली. तन्मयचे वडील वकील तर आई सुनिता या शिक्षिका. कोणतीही लष्करी पाश्र्वभूमी नसताना त्याने मिळविलेले यश लक्षणीयच म्हणावे लागेल. शहरातील विस्डम हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या तन्मयने आतापर्यंत प्रत्येक परीक्षेत ७५ ते ८० टक्क्यांदरम्यान गुण मिळवले आहेत.
अकरावी व बारावी (विज्ञान) शाखेचे शिक्षण त्याने आरवायके महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर पुण्यालगतच्या अवसरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याने मॅकेनिकल अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. लढाऊ विमान चालविण्याची प्रचंड ओढ असल्याने बारावीचा अभ्यास करतानाच तो एनडीए प्रवेश परीक्षेच्या तयारीला लागला. विशेष म्हणजे, केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही परीक्षा देताना त्याने कोणताही क्लास लावला नाही. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर एसएसबी मुलाखतीच्या तयारीसाठी त्याने पुण्यात ‘अॅपेक्स करिअर्स’मध्ये महिनाभर प्रशिक्षण घेतले. त्यावेळी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राम्हणकर यांच्या मार्गदर्शनाचा चांगलाच लाभ झाल्याचे त्याने आवर्जून नमूद केले. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सलग सहा दिवस चालणाऱ्या एसएसबी मुलाखतीसाठी जेव्हा त्याला बोलावणे आले, तेव्हा तो कालावधी नेमका अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षेचा होता. त्यावेळी पालकांनी अभियांत्रिकीची परीक्षा बुडाली तरी चालेल परंतु, मुलाखतीला जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. कुटुंबियांच्या पाठबळामुळे अभियांत्रिकीचे सर्व पेपर बुडवून आपण मुलाखतीची प्रक्रिया पार पाडल्याचे तन्मयने सांगितले. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचे स्वरूप बारावी समकक्ष असते. या निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा व मुलाखत असे दोन टप्पे असतात. लेखी परीक्षेसाठी गणित व सर्वसाधारण पात्रता चाचणी असे दोन प्रकारचे पेपर असतात. सर्वसाधारण पात्रता चाचणीच्या पेपरमध्ये इतर सर्व विषयांचा समावेश असतो. मुलाखतीची प्रक्रिया सहा दिवसांची असून त्यात गटचर्चा, मानसिक चाचणी, वैयक्तिक मुलाखत आदींचा समावेश असल्याचे त्याने नमूद केले. बास्केटबॉलमध्ये राज्य पातळीपर्यंत चमक दाखविणाऱ्या तन्मयला फुटबॉल व टेबलटेनिसमध्येही रुची आहे. याशिवाय अधूनमधून ट्रेकिंग तसेच वेगवेगळ्या परीक्षा देण्याची आवड आहे. आजवर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो), आयआयटी, एआय ट्रीपल ए, न्युक्लिअर कॉर्पोरेशन नेक्ट बीपीआय आदी परीक्षा दिल्या आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर लढाऊ विमान घेऊन आकाशात घिरटय़ा मारण्याचे त्याचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकेल.